दानोळीत तरुणाचा खून

दानोळीत तरुणाचा खून
Published on

दानोळीत २५ लाखांच्या खंडणीसाठी
व्यावसायिकाचे अपहरण करुन खून

दोन तरुण ताब्यात; शॉक, मारहाणीनंतर मृतदेह टाकला शेतात

दानोळी, ता. १४ ः येथील घाऊक भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय ४२) या तरुणाचे अपहरण करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहरणकर्त्यांनी २५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. या प्रकारामुळे दानोळी परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी संशयित राजदीप ताडे, मंथन चंदुरे (रा. दानोळी, ता. शिरोळ) यांना अटक केली. पोलिसांच्या तपासातील दिरंगाईमुळे तरुणाचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, भरतेश यांचे अपहरण झाल्याची आणि खंडणीचा फोन आल्याची माहिती नातेवाईकांनी मध्यरात्रीच जयसिंगपूर पोलिस ठाण्यात दिली होती; मात्र पोलिसांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यानंतर नातेवाईक, मित्रमंडळी व पोलिस पाटील प्रशांत नेजकर यांनी रात्रभर भरतेश यांचा शोध घेतला. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भरतेश यांचा मृतदेह एका शेतामध्ये आढळून आला. त्यांच्या शरीरावर मारहाणीसहीत कानामागे चाकूचा खोलवर वार तसेच मानेवर, पोटावर, कानाला व गुप्तांगावर विजेचे शॉक दिल्याच्या खुणा दिसून येत होत्या. या मारहाणीनंतर त्यांचा गळा दाबून खून केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. रात्री अपहरण केल्यानंतर मध्यरात्रीच त्यांचा खून करण्यात आल्याचाही पोलिसांचा संशय आहे. भरतेशच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई, भाऊ, भावजय, पुतण्या व पुतणी असा परिवार आहे.

तर जीव वाचला असता...
रात्री अकरा वाजता नातेवाईक पोलिस ठाण्यात तक्रारीसाठी गेले होते. खंडणीच्या फोनचे रेकॉर्डिंग ऐकविल्यानंतरही पोलिसांनी केवळ बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन, ‘उद्या बघू’, असे सांगून तक्रारदारांना परत पाठविले. त्याचवेळी पोलिसांनी तपास आणि हालचाल केली असती; तर कदाचीत भरतेश यांचा जीव वाचला असता, असा सूर नागरिकांमध्ये होता. आज सकाळीही शोध घेत असताना काहींनी पोलिसांना लवकर तपास करण्याची विनंती केली असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

एकावर डोळा, दुसऱ्यावर गेम
एका मोबाईल व्यावसायिकावर संशयितांचा आधीपासूनच डोळा होता. त्याला अडवून लुटण्याचा किंवा अपहरण करण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, त्या रात्री संबंधित व्यावसायिक अपेक्षेप्रमाणे त्या मार्गावर आलाच नाही. त्याचवेळी भरतेश टोपगोंडा हे घरी जाताना संशयितांच्या तावडीत सापडले आणि त्यांचे अपहरण करून आरोपींनी आपला डाव साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com