आयजीएम रुग्णालयात मैत्री मंच उपक्रम सुरू

आयजीएम रुग्णालयात मैत्री मंच उपक्रम सुरू
Published on

58333
एआय चित्र.

‘आयजीएम’ रुग्णालयात आता मैत्री मंच
विद्यार्थ्यांसाठी मोफत समुपदेशन; परीक्षा, करिअरमधील मानसिक ताणावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
संदीप जगताप : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १९ : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातर्फे (आयजीएम) मैत्री मंच हा उपक्रम सुरू केला आहे. परीक्षा, करिअरची चिंता, अभ्यासाचा ताण, मोबाईलचे वाढते व्यसन, भूक-झोप कमी होणे, चिडचिड, भीती वाटणे, एकटे राहण्याची प्रवृत्ती अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत समुपदेशन व मार्गदर्शन केले जाणार आहे.
सध्याच्या काळात परीक्षा आणि करिअरची चिंता, अभ्यासाचा ताण, मोबाईलचे वाढते व्यसन, झोप कमी होणे यांसारख्या विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेकदा विद्यार्थी आपल्या या समस्या पालक, शिक्षक किंवा मित्रांजवळ मोकळेपणाने मांडू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमधील मानसिक ताणतणाव वेळेत ओळखून त्यांना मदत उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
ही सेवा रुग्णालयाच्या समुपदेशन कक्षात उपलब्ध केली आहे. सोमवार ते गुरुवारदरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत हे समुपदेशन चालणार आहे. या सेवेसाठी क्ययूआर कोडद्वारे ऑनलाईन पूर्वनोंदणी करणे आवश्यक असणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार व्यक्तिगत समुपदेशन, सीबीटी व आरईबीटी आधारित थेरपी, तसेच ग्रुप समुपदेशन आणि कौटुंबिक समुपदेशन अशा विविध प्रकारांच्या सेवा पुरवल्या जात आहेत. समुपदेशनादरम्यान विद्यार्थ्यांनी दिलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मानसिक आरोग्य म्हणजे केवळ आजार नाही, तर तणावाच्या काळात स्वतःला सावरणे आणि आव्हानांना सामोरे जाणे आहे. त्यामुळे अडचण जाणवल्यास मदत घेणे ही कमजोरी नसून जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकोचाशिवाय तज्ज्ञांशी संवाद साधावा. असे आवाहन रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष पोळ यांनी केले आहे.
-----------------
चौकट
वर्तनातील बदल ओळखा...
पालक आणि शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या वर्तनातील अचानक होणारे बदल, अभ्यासातील अनुत्साह किंवा चिडचिड याकडे संवेदनशीलतेने पहावे. एखादा विद्यार्थी तणावात असल्यास त्याला दोष न देता समुपदेशकांकडे नेऊन सकारात्मक मदत मिळवून द्यावी, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
------------------
कोट
मैत्री मंचच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि विश्‍वासार्ह वातावरणात आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळणार असल्याने हा उपक्रम मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
-डॉ. संतोष पोळ, वैद्यकीय आधीक्षक आयजीएम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com