

58545
गडहिंग्लज ः पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावरच्या भरावातील मोठे दगड उघडे पडलेत खाचखळग्यामुळे धक्क्याचा प्रवास असह्य होत आहे. त्याचे सपाटीकरण गरजेचे आहे. (आशपाक किल्लेदार ः सकाळ छायाचित्रसेवा)
भडगाव रोडचे ‘धक्के’, उपचारास जाणे ‘पक्के’
वाहनधारकांतून संताप; नव्या पुलाच्या भरावावरील खाचखळग्यांनी केले हैराण
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० ः गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगावजवळ नवा पूल झाला. दोन्ही बाजुच्या जोडरस्त्याला मुरुमाचा भराव टाकून वाहतूक सुरू केली. परंतु, त्यानंतर भराव खचून त्यावर खाचखळगे वाढले आहेत. दरम्यान, काम बंद झाल्याने भरावाचे सपाटीकरण रखडल्याने वाहनधारकांना धक्के खावे लागत आहेत. परिणामी, मणक्याच्या त्रासांनी हैराण झालेल्या प्रवाशांना उपचार घ्यावे लागत आहेत.
जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात भडगाव पूल वाहतुकीसाठी खुला केला. या पुलाला दोन्ही बाजूने रस्ता जोडण्यासाठी मुरूमाचा भराव टाकला आहे. पावसाळा सुरू झाल्याने महापुरात या भरावामुळे शेतवडीत पाणी थांबून नुकसान होण्याचा धोका असल्याची भावना व्यक्त करत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी भरावप्रश्नी आंदोलन केले. पाणी थांबू नये म्हणून उपाययोजना करेपर्यंत भरावाचे काम बंद करण्याची सूचना आंदोलकांनी केली. त्यावर पर्याय शोधण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली होती. परंतु, त्यानंतर पाठपुराव्याच्या हालचाली थंड आहेत. दरम्यान, महिन्यापूर्वी टाकलेला भराव प्रचंड वाहतुकीने ठिकठिकाणी खचला आहे. त्याचे रूपांतर खाचखळग्यांत झाले आहे. पुन्हा मुरूम टाकून या भरावाचे सपाटीकरण आवश्यक आहे. परंतु, त्याबाबत कोणत्याच हालचाली दिसत नाहीत.
गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक मोठी आहे. अवजड वाहनांसह मोटारी, दुचाकींची संख्या अधिक असते. या रहदारीमुळे उतरलेला भराव व त्यामुळे पडलेल्या खाचखळग्यांतून वाहन चालविणे मोठी कसरत होत आहे. एसटी असो अथवा चारचाकी, दुचाकी वाहने असो आतील प्रवाशांना धक्के खातच प्रवास करावा लागत आहे. पावसात तर साचलेल्या पाण्यामुळे खाचखळगे दिसत नाहीत. त्यामुळे आहे त्या वेगात वाहने जात असल्याने हे धक्के सहन न करण्यापलीकडचे ठरत आहेत. त्यावर औषधोपचार घेण्याशिवाय प्रवाशांसमोर पर्याय राहिलेला नाही.
---------------
चौकट
काँक्रिटीकरणही रखडले...
शहरातील दसरा चौक ते नाकोडा ट्रेडर्सपर्यंतच्या अंतरातील बहुतांशी काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु, काही ठिकाणी काँक्रीटीकरण रखडले आहे. जलवाहिनीच्या कामासाठी त्याचे काम थांबल्याचे सांगण्यात येते. शिवाय भरावाच्या अभावी शिल्लक राहिलेल्या भागातही खड्ड्यांचे साम्राज्य बनले आहे. टाकलेल्या भरावातील मोठमोठे दगडही उघडे पडले आहेत.
--------------
कोट
भडगाव पुलाच्या जोडरस्त्यावर नव्याने भराव टाकण्याचे काम थांबले आहे. आधीच टाकलेल्या भरावात तयार झालेल्या खाचखळग्यांच्या सपाटीकरणाचे काम लवकरच सुरू करण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या आहेत.
- अमित पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.