

69558
कोल्हापूर ः राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये डॉ. तेजस्विनी देसाई लिखित ‘अग्निशिखा’ व ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’ पुस्तकांच्या प्रकाशनप्रसंगी डावीकडून डॉ. तेजस्विनी देसाई, प्रकाश आबिटकर, शारदा साठे, विवेक सावंत, आनंद मेणसे, निर्मलादेवी चव्हाण.
...............
सावित्रीबाईंमुळेच महिलांना जगण्याचा आधार
शारदा साठे ः ‘अग्निशिखा’, ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १४ : ‘महिलांनी त्याग, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करून समाजाला दिशा दिली. मात्र, इतिहासात त्यांच्या योगदानाची पुरेशी नोंद घेतली गेली नाही. पितृसत्ताक व्यवस्थेने महिलांना दुय्यम ठरवले असले तरी सावित्रीबाई फुलेंसारख्या क्रांतिकारक महिलांच्या कार्यामुळेच आजच्या स्त्रियांना उभे राहण्याचा आधार मिळाला,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सदस्या शारदा साठे यांनी येथे केले.
डॉ. तेजस्विनी देसाई लिखित आणि लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई प्रकाशित ‘अग्निशिखा’ (भारतीय महिला वैज्ञानिक) व ‘एंगल्स आणि आधुनिक निसर्ग विज्ञान’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. साठे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रम राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये झाला.
साठे म्हणाल्या, ‘महिलांना पितृसत्ताक पद्धतीने निर्बुद्ध ठरविले असले तरी त्यांनी शिक्षण व सामाजिक परिवर्तनासाठी अनेक यातना सहन केल्या, बलिदान दिले. सावित्रीबाई फुले नसत्या, तर आजच्या महिलांना पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेला आधार मिळाला नसता. बहिणाबाई व जनाबाई यांनी आजच्या स्त्रीवादापेक्षा वेगळे काही सांगितले नाही. डीजेच्या गोंगाटात चार चांगल्या गोष्टी ऐकू येत नाहीत. विरोध करणाऱ्यांना तुरूंगात डांबले जात आहे. अशी परिस्थिती सध्या देशात दिसत असून, कोणाला घाबरण्याचे कारण नाही. मोदी व शहा यांनाही घाबरू नका. अहिंसा हेच मोठे शस्त्र असून, त्या आधारे अनिष्ठ गोष्टींविरोधात लढण्यासाठी सज्ज राहा.’
आबिटकर म्हणाले, ‘महिलांच्या प्रगतीचा वेग वाढला असून, काळानुसार त्यांचे कार्यक्षेत्र विस्तारले आहे. आज महिला राजकारण, समाजकारण, विज्ञानासह अन्य क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.’
डॉ. सावंत म्हणाले, ‘विज्ञानाच्या तत्त्वचिंतनाची समृद्ध परंपरा आहे. एंगल्स यांनी आधुनिक निसर्गविज्ञानाकडे सम्यक दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील सामाजिक परिस्थिती व विज्ञानातील घडामोडींचा संदर्भ लक्षात घेतल्यास त्यांच्या विचारांचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.’ डॉ. देसाई म्हणाल्या, ‘अग्निशिखा पुस्तकासाठी महिला वैज्ञानिकांचा शोध घेताना मोठी यादी समोर आली. त्यापैकी २३ महिला शास्त्रज्ञांचा पुस्तकात समावेश केला आहे.’ प्राचार्य आनंद मेणसे यांनी प्रास्ताविक केले.
.............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.