
कोवाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
01194
कोवाड ः कोवाड बाजारपेठेत भटकी कुत्री अशी घोळक्याने फिरत आहेत.
-------------
कोवाडमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत
नागरिकांत भिती ः बंदोबस्त करण्याची मागणी
अशोक पाटील ः सकाळ वृत्तसेवा
कोवाड, ता. २८ ः येथील बाजारपेठेत भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाली आहे. कुत्र्यांचे कळप पाहिले की अंगावर शहारे येत आहेत. पहाटे व रात्री ती घोळक्याने फिरत असल्याने नागरिकांत भिती निर्माण होत आहे. पाळीव कुत्री व जनावरांवर या कुत्र्यांचे हल्ले होत आहेत. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी वाहनांचा पाठलाग करत असल्याने अपघात होत आहेत. दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
कोवाड बाजारपेठेत किमान चाळीस भटकी कुत्री आहेत. त्यांच्यात हिंस्त्रपणा वाढला आहे. ती धोकादायक वाटत आहेत. जनावरांवर, पाळीव कुत्र्यांवर हल्ला करत आहेत. अनेक महिन्यांपासून हा प्रश्न नागरिकांच्या चर्चेत आहे. पण कुठलीही यंत्रणा त्याची दखल घेत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रात्री कळपाने ही कुत्री किणी हद्दीतील बसस्थानकापासून व मुख्य बाजारपेठेत फिरत असतात. कळपात किमान २५ ते ३० कुत्री असल्याने नागरिकांना भिती वाटत आहे. रात्रीच्या ओरड्याने लोक त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांच्या भितीपोटी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणारे लोक हातात काठ्या घेऊन जाऊ लागले आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जाईल,असा त्यांना विश्वास आहे. दिवसभर ही कुत्री शेतातून किंवा माळरानावर राहत आहेत. रात्री नऊ वाजल्यानंतर किणी हद्दीतील बसस्थानक परिसरात एकत्र जमतात. बेळगांव रस्ता, दुंडगे रोड, नेसरी रोड व निट्टूर रोडवर त्यांचा दररोजचा वावर ठरलेला आहे. चिकन किंवा मटन दुकानातील टाकाऊ मांसावर त्यांचा डोळा असल्याने ती बाजारपेठ पिंजून काढतात. त्यामुळे त्यांच्या हिंस्त्रपणा वाढत आहे. रात्रीच्यावेळी बाजारपेठेत जाण्यालाही लोकाना भीती वाटत आहे. संबंधित विभागाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करुन लोकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
-------------------------
भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कळपाने कुत्री फिरत असल्याने धोका वाटत आहे. संबंधित विभागाने यांचा बंदोबस्त करावा करावा.
-देवेंद्र शेट्टी, कोवाड