
बिनविरोधसाठी कर्मचाऱ्यांचा आग्रह
जि. प. कर्मचारी सोसायटी निवडणूक ... लोगो
...
बिनविरोधसाठी कर्मचाऱ्यांचा आग्रह
आज सत्ताधारी-विरोधकांची बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२: जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे, तर ५ जानेवारीपर्यंत अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्याकडून होऊ लागली आहे. त्यामुळेच सत्ताधारी व विरोधक यांनी बुधवारी (ता.३)संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांनीही जोर लावला आहे. ही निवडणूक २१ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही पॅनेलमध्ये मोठी गळती झाली आहे. गेल्या निवडणुकीतील अनेक कर्मचारी आज परस्परविरोधी पॅनेलमधून निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. अर्ज माघारीनंतर (ता.५) या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारानिमित्त दोन्ही गट प्रचारात सक्रिय झाले आहेत. मुख्यालयातील प्रचार आटोपून त्यांनी तालुक्यातील कर्मचाऱ्यांच्याही भेटीगाठी सुरू ठेवल्या आहेत. या भेटीगाठीतूनच बिनविरोधची चर्चा पुढे आली आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुखांनी बिनविरोधसाठी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत निवडणुकीबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.