सकल जैन समाज मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सकल जैन समाज मोर्चा
सकल जैन समाज मोर्चा

सकल जैन समाज मोर्चा

sakal_logo
By

73023
कोल्हापूर : सम्मेद शिखरजीला धार्मिक स्थळाचा दर्जा द्या, पर्यटनस्थळ नको, या मागणीसाठी जैन बांधवांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला विराट मोर्चा. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)

वाढावा फोटो
73043
कोल्हापूर : जैन समाजाच्या मोर्चातर्फे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी आणि स्वस्तिश्री लक्ष्मीसेन पट्टारक भट्टाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजू शेट्टी, संजय शेटे आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.
(मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


...प्रसंगी दिल्लीवर धडक मारू
---
सम्मेद शिखरजीप्रश्नी जैन समाजाचा विराट मोर्चाद्वारे इशारा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : झारखंडमधील सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र करण्याचा निर्णय म्हणजे जैन समाजाच्या हृदयावर वार करण्याचा प्रकार आहे. त्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून, आमचे पाय नाही तर आता मस्तकही तापले आहे. सरकारने वेळीच मौन सोडले नाही तर दिल्ली दरबारी धडक मारू, असा इशारा स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी आज येथे दिला.
सकल जैन समाजातर्फे झारखंड सरकारच्या निषेधार्थ काढलेल्या विराट मूक मोर्चावर झालेल्या सभेत ते बोलत होते. दसरा चौक, आईसाहेब महाराज पुतळा, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, गुजरी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटी, सीपीआर, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग राहिला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. ‘एक जैन, लाख जैन’च्या घोषणेने परिसर दणाणून गेला. सोमवारी (ता. ९) सांगली येथे मूक मोर्चा होणार असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, सकल हिंदू समाजाचे संभाजी साळुंखे यांनी मोर्चाला पाठिंबा दिला.
जिनसेन महास्वामी म्हणाले, ‘‘भाई और बहनो म्हणणाऱ्यांचे आम्ही भाई नाही का? आम्ही कोणतीही भूमी मागत नाही. मनात आणले तर आम्ही पैसे उभारून हवे ते बांधू शकतो. मात्र, सिद्धक्षेत्र बांधता येत नाही. त्यामुळेच सम्मेद शिखरजीसाठी रस्त्यावर उतरलो आहोत. आमच्यात ताकद असून, यापुढे आंदोलन सुरूच राहील.’’
ते म्हणाले, ‘‘गिरनार, बाहुबलीनंतर सम्मेद शिखरजीच्या निमित्ताने थेट आमच्या हृदयावर वार करण्यात आला आहे. हिंदू, मुस्लिम, जैन समाजाच्या पाठिशी ठाम आहे. सरकारने आता मौन सोडण्याची गरज आहे; अन्यथा दिल्लीतील लाल किल्ल्यासमोर आंदोलन छेडले जाईल. आम्ही अहिंसक आहोत, याचा अर्थ भित्रे नाही. महावीर भगवान दीक्षा घेण्यापूर्वी क्षत्रिय होते. त्यांचे वारस हे कसे विसरतील?’’ जैन समाज सर्वाधिक कर भरणारा समाज आहे. आम्ही आता न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही. प्राचीन परंपरांची आमची गिरनार, पालिथाना, शत्रुंजय, सम्मेद शिखरजीसह अन्य क्षेत्रे घेतल्याशिवाय शांत राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मीसेन महास्वामी म्हणाले, ‘‘केंद्र व झारखंड सरकारचा सम्मेद शिखरजीला पर्यटन क्षेत्र करण्याचा निर्णय योग्य नाही. आम्ही देशाच्या प्रगतीत अडथळा आणत नाही. सिद्धभूमीच्या ठिकाणीच पर्यटन कशासाठी? मत्स्य, कुक्कुटपालनासह बारला परवानगी मिळणार असेल तर तेथे पवित्रता राहणार नाही. आमचे अस्तित्व राहणार नाही. जगा व जगू द्या, या सूत्राने आम्ही वागणारे आहोत. आम्ही अहिंसावादी आहोत. मात्र नपुंसक नाही. आम्ही संयमाने राहणारे असलो तरी आमच्या संयमाचा बांध फुटू देऊ नका. एका मोर्चाने आम्ही गप्प बसणार नाही.’’ सम्मेद शिखरजीला जैन तीर्थक्षेत्र जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. आरिका माताजी यांनी जैन समाजाला चूक भोवल्याचे परखड शब्दांत सांगितले.
या वेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, संजय शेटे, डी. सी. पाटील, रावसाहेब पाटील, नाना गाठ, माजी महापौर सुरेश पाटील, राहुल चव्हाण, विक्रांत पाटील-किणीकर, डॉ. पद्मावती पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील सुमारे २२ ते २५ हजारांहून अधिक जैन बांधवांनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, असे पोलिसांनी सांगितले.

* लक्षवेधी फलक...
- सम्मेद शिखरजी जैनांच्या हक्काचे- नाही कुणाच्या बापाचे
- आपण सगळे एक होऊया- शिखरजी तीर्थक्षेत्र वाचवूया
- आश्वासन नको- कृती करा
............
* दृष्टिक्षेपात...
- ‘सम्मेद शिखरजी बचाओ’ मजकूर लिहिलेल्या टोप्या बांधवांच्या डोक्यावर
- मोर्चाचा मार्ग गर्दीने फुलला, वाहतूक व्यवस्थेची ठिकठिकाणी कोंडी
- मोर्चात महिलांचा लक्षवेधी सहभाग, महावीर उद्यानात बांधवांची गर्दी