प्रेस क्लब कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेस क्लब कार्यक्रम
प्रेस क्लब कार्यक्रम

प्रेस क्लब कार्यक्रम

sakal_logo
By

फोटो - KPC23B11440
...

भारताच्या विकासात कट्टरतावादाचा अडथळा

सुधींद्र कुळकर्णी : ‘सकाळ’चे सदानंद पाटील ‘लक्षवेधी’ पुरस्काराने सन्मानित
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ६ : ‘भारताच्या विकासात कट्टरतावादामुळे अडथळा निर्माण होत आहे’, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्तंभलेखक सुधींद्र कुळकर्णी यांनी आज येथे केले.
कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते ‘सकाळ’चे विशेष प्रतिनिधी सदानंद पाटील यांना आरोग्यदूत रोहन जीवन साळोखे यांच्या स्मरणार्थ ‘लक्षवेधी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सकाळ माध्यम समूहाचे संपादक-संचालक श्रीराम पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी कुळकर्णी यांनी ''लोकशाहीच्या संरक्षणासाठी राज धर्म पाहिजे, मीडिया धर्म पण पाहिजे,'' विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज प्रमुख उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम झाला.
कुळकर्णी म्हणाले, ‘‘जनसामान्यांपर्यंत पोचण्याची ताकद मातृभाषेतील वृत्तपत्र करते. देशाचा सर्वसमावेशक विकास मेट्रो सिटी नव्हे तर जिल्हा केंद्र प्राधान्याने ठरवेल. त्यात पुरोगामी जिल्हा म्हणून ओळख असलेला कोल्हापूर ग्रोथ सेंटर म्हणून भूमिका बजावेल. जिल्हा केंद्रात मातृभाषा सुरक्षित आहे. शेकडो केंद्रांत परिर्वतन होणार आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जग सपाट झाले असून, चीन व भारतातील समृद्धी वाढत आहे. पश्चिमेचे प्रभुत्व कमी झाले आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘भूतकाळातील वादविवादात समाजाला अडकवू नका. भविष्यमुखी बनून भारताचे भविष्य उज्ज्वल बनवा. त्यासाठी परस्पर सहकार्याने भविष्याची हाक ऐकूया. ही ऐतिहासिक संधी आहे. माणुसकी म्हणजेच धर्म आहे, हे लक्षात घेऊन मानवी नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत, हे लक्षात घेऊया.‘सर्व जन सुखाय सर्व जन हिताय,’ असे ब्रीद घेऊन शेवटच्या माणसाचा उत्कर्ष साधला पाहिजे.’’
ईडीचा गैरवापर, विरोधकांना जेल, आमदारांच्या अपहरणासह सरकार पाडणे म्हणजे राजधर्म आहे का?, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. श्रीराम पवार मराठी पत्रकारितेच्या आकाशातील ध्रुवतारा असून, ते कोल्हापुरात राहून जगभरातील घडामोडींची अभ्यासपूर्ण मांडणी करत आहेत, असे गौरवोद्वारही त्यांनी काढले.
खासदार धनंजय महाडिक यांनी दिवसाची दिशा वृत्तपत्रांवर ठरवावी लागत असल्याचे सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
या वेळी प्राचार्य प्रशांत पालकर, सुधीर शानभाग, किशोर देशपांडे, पद्माकर कापसे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. आलोक जत्राटकर, सुनील बासराणी, सुनीता मेंगाणे यांचा सत्कार झाला. प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजय केसरकर यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष उद्धव गोडसे यांनी पुरस्कारांमागील भूमिका विशद केली.
............
चौकट

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा सत्कार

श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा उद्या (ता. ७) अमृतमहोत्सवी वाढदिवस होत आहेत. त्यानिमित्त प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन मेस्त्री यांच्या हस्ते शाहू महाराज यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार झाला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना शुभेच्छा दिल्या.