
खांडेकर व्याख्यानमाला
74132
लोगो
...
नात्यात व्यवहार आल्यास आनंद दुरावतो
रवींद्र देशपांडे ः प्रेमाची व्याख्या जाणून घेणे महत्त्वाचे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘नात्यात व्यवहार आला की, आनंद कमी होतो. ज्या घरात आनंद नाही, तेथे मूल्यमापन चुकते आहे. विचारांची बैठक कमी पडल्याने माणूस आनंदाला मुकतो’, असे प्रतिपादन रवींद्र देशपांडे यांनी आज येथे केले.
करवीरनगर वाचन मंदिरातर्फे आयोजित पद्मभूषण वि. स. खांडेकर व्याख्यानमालेत त्यांनी दुसरे पुष्प गुंफले. ‘भक्तिमय, शक्तिमय, आनंदमय कुटुंब’, विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. करवीरनगर वाचन मंदिरातील सभागृहात त्याचे आयोजन केले आहे.
देशपांडे म्हणाले, ‘जगायला आवश्यक प्रेम असून, प्रेमाची व्याख्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे. काही देश उद्ध्वस्त झाले आहेत. त्याच्या मुळाशी गेल्यास त्यांचे राष्ट्रप्रमुख उद्ध्वस्त कुटुंबातून आल्याचे दिसते. संस्था, कारखान्यांत सुदृढ सशक्त कुटुंबातून लोक आले, तर ते सशक्त होतील. जर पती-पत्नीत भांडण होत असेल, तर घरात आनंद येऊ शकत नाही. अलीकडच्या काळात घटस्फोट, व्यसनांच्या समस्या गंभीर बनल्या आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘एखादे कुटुंब आनंदमय असणे शक्य आहे का? ही कल्पना आहे की वास्तव, असा प्रश्न पडतो. काही कुटुंबीयांना भेट दिल्यानंतर मात्र त्यातील वास्तव कळते. भंगार गोळा करायला येणारा व घंटागाडी चालक असणाऱ्या कुटुंबाला मी भेट दिली. त्यांच्याकडे पैसा नसतानाही ही कुटुंबे आनंदी होती. घरातील मुले-मुली मोबाईलच्या नादाला लागली असून, त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आजही लोक मूर्च्छितावस्थेत जगत आहेत. पाल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यावरच तो यशस्वी होईल, अशी पालकांची मानसिकता बनली आहे.’ तसेच लाखो रुपये असलेले लोक कोरोनात वाचले आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी आनंदाचे वातावरण निर्माण करण्याची मानसिकता असणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी सचिन कुलकर्णी, रमा संगोराम, सुरेश सोनटक्के उपस्थित होते. प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे यांनी सूत्रसंचालन केले. उदय सांगवडेकर यांनी प्रास्ताविक केले. अश्विनी वळीवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मंगेश राव यांनी आभार मानले.
.........
* आजचे व्याख्यान
* वक्ते - बंडा जोशी
* विषय - एकपात्री हास्यधमाल
* वेळ - सायंकाळी सहा वाजता