रिपोर्ताज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिपोर्ताज
रिपोर्ताज

रिपोर्ताज

sakal_logo
By

रिपोर्ताज… प्रसिध्द ता. १९ जानेवारी…

कोल्हापूरची क्रीडा, खासगी मैदानावर!
शासकीय यंत्रणा निद्रावस्थेत ः

१ सागर पाटील जलतरण तलाव
२ छत्रपती शाहू स्टेडियम

रिपोर्ताज… 
काही दिवसांपूर्वी मला एक व्यक्तीचा फोन आला. क्रीडा क्षेत्रातील ही व्यक्ती जे बोलली ते मन अस्वस्थ करणारे होते. शहरात खासगी मैदाने व क्रीडा सुविधा शासकीय सुविधांपेक्षा अधिक चांगल्या असल्यामुळे याच्याच आधारावर सध्या कोल्हापूरचे क्रीडा विश्व तग धरून आहे. खरंच, शहरातील या खासगी क्रीडा सुविधा इतक्या चांगल्या आहेत का ? हे बघणे अधिक महत्त्वाचे आहे.

सुयोग घाटगे   
   
सागर पाटील जलतरण तलाव हा जिल्ह्यातील जलतरणपट्टूंचा तारणहार तलाव. ५० मीटरची लांबी, स्वच्छ व नितळ पाणी, खेळाडूंसाठी फ्रेश रूम, चेंजिंग रूम या सुविधा देखील अधिक चांगल्या पद्धतीने आहेत. कदमवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू कॉलेज परिसरामध्ये हा सुसज्ज तलाव. खेळाडूंसाठी असणाऱ्या सुविधांसह प्रेक्षकांसाठीही योग्य सुविधा असल्यामुळे या तलावामध्ये सराव आणि स्पर्धा करणे खेळाडूंसाठी महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह आयर्नमॅन सारख्या किताबासाठी सराव करणारे याच तलावाचा आधार घेतात. गेल्या सहा महिन्यांत या तलावांवर झालेल्या राज्य व राष्ट्रीय स्पर्धांवरूनच या तलावाचा दर्जा लक्षात येणे सर्वांनाच सोपे जाईल. येथे उभारती जलतरणपटू गिरीजा मोरे हिची भेट झाली, पुढे जाऊन राष्ट्रीय स्पर्धांसाठी हे तलाव आदर्श असून तलाव खेळाडूंसाठी वरदान ठरत असल्याचे मत व्यक्त केले.

भवानी जलतरणावर गर्दी, शासकीय कूचकामीच!
 पिराजीराव घाटगे फिजिकल एजुकेशन चॅरिटेबल ट्रस्ट संचलित भवानी जलतरण तलाव हा कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशनचा तलाव. तलावाचा सर्वाधिक आधार हा शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील खेळाडूंना आहे. ट्रस्ट या तलावाची देखरेख करते, पोहण्याचे प्राथमिक धडे घेणाऱ्यापासून ते अगदी शिवाजी विद्यापीठाचा संघ निवड प्रक्रियाही याच तलावामध्ये झाली. येथे खेळाडूंसाठी नेटक्या सुविधा दिल्यामुळे डिसेंबर ते जून या कालावधीमध्ये सर्वाधिक गर्दी या ठिकाणी दिसते. शहरातील मोठे आणि खोटे वास्तव असणाऱ्या शासकीय तलावांचे अस्तित्व मात्र कूचकामीच आहे.
 
‘के. एस. ए.’शी ७७ वर्षे जिव्हाळ्याचे नाते
  के. एस. ए. म्हणजे कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचे नाते असणारे क्रीडा असोसिएशन. फुटबॉल, क्रिकेट, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, पोलो, खोखो, योगा असे अनेक खेळांचे आश्रयस्थान म्हटल्यास वावगे ठरणार नाही. १९४० पासून हे असोसिएशन कोल्हापूरची क्रीडा संस्कृती टिकवून आहे. यासाठी स्वतःचे मैदान देऊ केले. शहराच्या मध्यभागी मैदानामध्ये चालणारा फुटबॉल सर्वपरिचित आहे. याच संकुलात क्रिकेट देखील खेळला जातो. साठमारी येथील जागेमध्ये लॉन टेनिस, तर प्रशस्त अशा हॉलमध्ये जिम्नॅस्टिक व योगाचे धडे दिले जातात. याच्याच पलीकडे टेबल टेनिस देखील स्वतःचे अस्तित्व टिकवून आहे. जिम्नॅस्टिकसाठी अद्ययावत उपकरणे या ठिकाणी असल्यामुळे खेळाडूंसाठी ही जमेची बाजू आहे.

...तर मैदान अंतरराष्ट्रीय
नव्या राजवाड्यामागे असणारे पोलो मैदान हे प्रसंगी फुटबॉलसाठीच लोकप्रिय आहे. स्टेडियमवर संतोष ट्रॉफीचे सामने सुरू असताना येथे भेट दिली. तेव्हा पश्चिम बंगालचा खेळाडू सुरजित हंसदा याची भेट झाली. स्पर्धेसाठीचे असे सुसज्ज मैदान अपेक्षित नसल्याचे त्याने सांगितले. काही तांत्रिक बाबी व रात्रीचे सामने खेळण्याची सुविधा झाल्यास मैदान अंतरराष्ट्रीय सामन्यासाठी उपयुक्त ठरेल, असे सांगितले.

हक्काचे मैदान नाही, तरीही खेळाडू चमकताहेत
फुटबॉल सोबतच क्रिकेटही खेळला जातो. आंतरराष्ट्रीय स्थरावर येथील खेळाडू चमकत आहेत, असे असून सुद्धा खेळासाठी हक्काचे मैदान नाही आहे. राजाराम कॉलेज मैदान व शासकीय तंत्रनिकेतनचे मैदान डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनने सज्ज केले. संस्थांशी सामंजस्य करार करून खेळाडूंसाठी मैदान उपलब्ध करून दिल्यामुळेच येथील क्रिकेटला मैदान आहे. सुरुवातीला मोकळा माळ असणाऱ्या या मैदानांनी आता कात टाकली आहे. उत्तम खेळपट्टी, उत्तम आउटफिल्ड यामुळे येथे सराव व स्पर्धा करणे खेळाडूंना शक्य झाले असल्याचे चित्र आहे.  

 
‘टर्फ’चे पसरते लोन
  शहरभरामध्ये ‘टर्फ’चे लोन पसरत आहे. बंदिस्त जागा, चेंजिंग रूम व स्वच्छतागृहाची नेटकी सुविधा व न होणारी रोक-टोक यामुळे स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून या टर्फवर गर्दी वाढत आहे. शहर परिसरामध्ये असणारे अधिकतर ‘टर्फ’ हे खासगी मालकीचे आहेत. एकंदरीतच कोल्हापूरचा क्रीडा विकास व्हायचा असेल आणि क्रीडा नगरी हे बिरुद भविष्यात देखील गाजवायचे असेल, तर शासकीय यंत्रणांनी डोळे उघडणे गरजेचे असून, मैदाने सुसज्ज करण्याची हीच वेळ आहे.