
फुटबॉल
सतेज चषक फुटबॉल स्पर्धा
८४४९९, ८६४९८
‘बालगोपाल’चा अंतिम सामन्यात प्रवेश
शिवाजी तरुण मंडळावर मात; २ विरुद्ध १ गोलफरकाने विजय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : सतेज चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत बालगोपाल तालीम मंडळाने शिवाजी तरुण मंडळावर २ विरुद्ध १ गोलफरकाने विजय मिळवत अंतिम सामन्यात आज प्रवेश केला. पूर्ण वेळेत दोन्ही संघांनी चांगल्या खेळाचे दर्शन घडवले. उत्तरार्धात शिवाजीच्या खेळाडूंनी बेधडक चढाया केल्या. बालगोपालच्या बचावफळीने तितक्याच ताकदीने चेंडू अडवून सामना बरोबरीत होणार नाही, याची दक्षता घेतली. पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे.
‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचे उद्घाटन केले. पाटाकडीलचे उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, संयोजन समितीचे अध्यक्ष संदीप सरनाईक, कार्याध्यक्ष संपत जाधव, सचिन चव्हाण, राजू साबळे, ईश्वर परमार, शेखर जाधव, राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते. सामना सुरू होताच, बालगोपालच्या खेळाडूंनी शॉर्ट पास देत गोल करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुढच्या फळीतून सूरज जाधव, ऋतुराज पाटील, अभिमन्यू साळोखे यांनी शिवाजीच्या बचावफळीतील खेळाडूंना चकवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सामन्याच्या १५ व्या मिनिटाला त्यात यश आले. ऋतुराजच्या पासवर अभिमन्यूने गोल करत बालगोपालला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शिवाजीकडून करण चव्हाण-बंदरे, योगेश कदम, संदेश कासार, शुभम साळोखे यांनी आक्रमक पवित्रा घेत चढाया केल्या. चेंडू घेऊन त्यांनी बालगोपालच्या मोठ्या डीत शिरकावही केला. चुकीचे फटके व असमन्वयामुळे त्यांना गोल करता आला नाही. बालगोपालच्या खेळाडूंने त्यांच्या मोठ्या डीत शिवाजीच्या संदेश कासार याला धोकादायकरीत्या अडवले. मुख्य पंचांनी त्यामुळे पेनल्टी किक बहाल केल्यानंतर शिवाजीकडून सुमीत जाधवने ३२ व्या मिनिटाला गोल केला. सामन्यात बरोबरी झाल्याने उत्तरार्धात कोण जिंकणार याची उत्सुकता वाढली.
बचावात्मक पवित्रा घेत संधी मिळाली की चढाई, असे धोरण बालगोपालने अवलंबले. शिवाजीकडून इंद्रजित, योगेश, करण गोल करण्यासाठी ईर्ष्येने खेळत होते. बालगोपालच्या बचावफळीतील खेळाडू त्यांना दाद देत नव्हते. बालगोपालचा व्हिक्टर चेंडू घेऊन शिवाजीच्या गोलजाळीच्या दिशेने जाताना त्याला रोखले जात होते. सामन्याच्या ७२ व्या मिनिटाला मात्र त्याने कमाल केली. शिवाजीची बचावफळी भेदत त्याने मोठ्या डीतून गोल केला. या गोलची परतफेड करण्यासाठी शिवाजीच्या खेळाडूंनी जीवाचे रान केले. त्यात त्यांना यश आले नाही. बालगोपालचा गोलरक्षक परमजितने केलेले गोलरक्षणही प्रभावी ठरले.
----------
चौकट
बाटल्या भिरकावल्या; पोलिसांचा लाठीमार
व्हिक्टरने गोल केल्यानंतर मैदानावर स्टेडियमच्या वरच्या गॅलरीतून बाटल्या भिरकावल्या गेल्या. सामना संपल्यानंतर समर्थक आपआपसांत भिडले. त्यांच्यात एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी तत्काळ लाठीमार करत त्यांना तेथून हटवले.
------------
आजचा सामना
- दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब, वेळ : दुपारी ४ वाजता.
---------
लढवय्या खेळाडू
शुभम साळोखे (शिवाजी तरुण मंडळ)