कुलगुरू क्रिकेट

कुलगुरू क्रिकेट

कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्‍पर्धा
-

मुंबई विद्यापीठ उपांत्य फेरीत दाखल
नाशिक, परभणी व नांदेड संघांचीही प्रतिस्पर्ध्यांवर मात

कोल्हापूर, ता. १९ : महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ कर्मचारी कुलगुरू चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने उपांत्य फेरीत प्रवेश केला. नाशिक, परभणी व नांदेड संघांने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले, तर शिवाजी विद्यापीठाचे दोन्ही संघ पराभूत झाले. शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर स्पर्धा सुरू आहे.
नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठ ‘ब’ संघावर २८ धावांनी विजय मिळवला. नांदेडने २० षटकांत ९ गडी गमावून १५३ धावा केल्या. अजमेर बिदला यांनी २४, शैलेश कांबळे यांनी नाबाद २० तर शिवाजी हंबर्डे यांनी नाबाद २७ धावा केल्या. शिवाजी विद्यापीठाकडून दीपक कांबळे, राजेश मुपडे व विशांत भोसले यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल शिवाजी विद्यापीठ-ब संघाला १८.२ षटकांत सर्व गडी गमावून १२५ धावापर्यंत मजल मारता आली. अभिजीत कोठावळेने ३५ धावा केल्या. नांदेडच्या राशिद शेख यांनी ५, तर शैलेश कांबळे यांनी ३ गडी बाद केले. राशिद शेख सामनावीर ठरले.
नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा आठ गडी राखून पराभव केला. सोलापूरने २० षटकांत १० गडी गमावून १२३ धावा केल्या. मुख्तार शेख यांनी ५५ धावा फटकावल्या. नाशिकच्या योगेश राऊत यांनी ३ तर मुकुंद मुळे यांनी २ गडी बाद केले. सोलापूरचे आव्हान नाशिक संघाने अवघ्या २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. राजेंद्र शहाणे यांनी ७६ व योगेश राऊत यांनी २५ धावा केल्या. योगेश राऊत सामनावीर ठरले.
परभणीच्या वसंतराव नाईक महाराष्ट्र कृषी विद्यापीठाने लोणेरेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठावर ७ गडी राखून मात केली. लोणेरे विद्यापीठाने ८ गडी गमावून १७३ धावा केल्या. संदेश जाभरे यांनी ४४, नीलेश भोईरे ३३ व विनायक तवसाळकर यांनी २४ धावा केल्या. परभणीच्या मारुती शिळाले यांनी ३ तर माणिक ढेंगे यांनी २ गडी बाद केले. परभणीने १५.५ षटकांत तीन गडी गमावून १७७ धावा केल्या. माणिक ढेंगे यांनी नाबाद ५१, मनोज कराळे ४२ व धीरज पाथ्रीकर यांनी नाबाद ३७ धावा केल्या. माणिक ढेंगे सामनावीर ठरले.
मुंबई विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठावर १८ धावांनी विजय मिळवला. मुंबईने १६८ धावा केल्या. त्यात अनिल घडसी यांच्या ४९ तर संजय पवार यांच्या ४१ धावांचा समावेश राहिला. शिवाजी विद्यापीठाकडून विश्वनाथ वरुटे व विनायक शिंदे यांनी प्रत्येकी दोन गडी तंबूत परतवले. शिवाजी विद्यापीठाला २० षटकांत ८ गडी गमावून १५० धावा करता आल्या. विश्वनाथ वरुटे याने २८, प्रसाद देसाई याने २२ धावा केल्या. मुंबईच्या विपुल खंदारे यांनी ४ तर श्रीकांत मोंडे यांनी २ गडी बाद केले. विपुल खंदारे सामनावीर ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com