सुप्रिया सुळे पत्रकार परिषद

सुप्रिया सुळे पत्रकार परिषद
Published on

फोटो सुप्रिया सुळे

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या,
तर पहिला हार मीच घालेन
खासदार सुप्रिया सुळे : महिला सुरक्षा, गोकुळ आणि शेतकरी प्रश्नांवर सरकारवर टीका
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जर राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या, तर त्यांना पहिला हार मीच घालेन,‌ असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.’’ त्यांनी महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, गोकुळ संघ, शेतकरी प्रश्न व राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
ज्येष्ठ इतिहास संशोधक (कै.) डॉ. जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी त्या आर. के. नगरमधील निवासस्थानी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे यांनी डॉ. पवार यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रा. डॉ. मंजुश्री पवार यांनी त्यांना डॉ. पवार यांचे ‘पंचगंगेच्या तीरावरून’ आत्मचरित्र भेट दिले.
खासदार सुळे म्हणाल्या, ‘‘नाशिकमधील निदा खान प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊ द्या, चौकशी पारदर्शक होऊन महाराष्ट्राला उत्तर मिळाले पाहिजे. महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार व परीक्षा प्रक्रियेमधील गोंधळ राज्यात वाढत चालला आहे. अशा गंभीर विषयांत आम्ही कधीही राजकारण केले नाही.‌ महिला व नागरिकांची सुरक्षितता ही प्रत्येक सरकारची जबाबदारी असते. महाराष्ट्राने विश्वासाने महायुतीला जनादेश दिला आहे. भ्रष्टाचारी लोकांना वाचवण्यासाठी नाही.’’
त्या म्हणाल्या, ‘पुणे देशाचे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जायचे. आता पुण्याचा उल्लेख शिक्षणाऐवजी क्राइम रेटसाठी होत आहे, हे दुर्दैवी आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहेत. सरसकट कर्जमाफीचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. कांदा, दूध व इतर उत्पादकांविषयी सरकारची भूमिका शेतकरीविरोधी आहे का? लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांनी महाराष्ट्रासमोर महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या समस्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही दबावाखाली न येता या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
................
चौकट
गोकुळमध्ये भ्रष्टाचार असेल,
तर कारवाई झालीच पाहिजे
गोकुळवर प्रशासक नेमला आहे. याचा अर्थ काहीतरी गंभीर बाब असावी. ‘दाल मे कुछ काला है,’ असेच दिसते. जर गोकुळमध्ये भ्रष्टाचार झाला असेल, तर संबंधितांवर कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून कुणालाही स्वच्छ केले जाऊ नये, असा टोला सुळे यांनी लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com