आमचं ठरलंय... गटारी नाही, मतदान नाही

आमचं ठरलंय... गटारी नाही, मतदान नाही

00902
कसबा बावडा : येथे तुंबलेल्या गटारी.

आमचं ठरलंय... गटारी नाही, मतदान नाही
बावड्यातील पाटील, चौगले गल्लीतील महिलांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
कसबा बावडा, ता. २९ : येथील पाटील गल्ली आणि चौगले गल्लीमध्ये पॅचेस आहे. या पॅचेसच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या गटारांची अवस्था दयनीय आहे. मागील चार वर्षांपासून इथली परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे आजार, रोगराईने नागरिक हैराण झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करूनही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे येथील संतप्त महिलावर्गाने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
या परिसरात चाळीस कुटुंबे आहेत. येथील गटारींच्या अवस्थेबाबत नागरिकांनी सातत्याने महापालिका अधिकारी, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. मात्र, कुणीही यावर तोडगा काढलेला नाही. इथे लहान मुलांची संख्याही जास्त असून गटारींमुळे त्यांचे खेळणे बंद आहे. गटारी खोल नाहीत, त्यामुळे पाणी साचून राहते. गटारी ओव्हरफ्लो झाल्या की सांडपाणी आणि शेपटी किडे रस्त्यावर येतात. यामुळे परिसरात रोगराई वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकही परिसरात असून अनेकांना डेंग्यूची लागण झाली आहे.
गटारी तुंबल्याने घुशी, उंदीर घरात येतात. भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो. महापालिका कर्मचारी स्वच्छतेसाठी पंधरा दिवसांतून एकदा येतात. आले तरी काम अर्धवट करून जातात. गटारी स्वच्छ करून उर्वरित कचरा येथील नागरिकांना साफ करावा लागतो. रस्ते धुवून काढावे लागतात. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत. आता आमचं ठरलंय... गटारी नाही तर मतदानही नाही, असा इशाराच महिला वर्गाने दिला आहे.
--------------
कोट
पावसाळ्यात गटारी तुंबतात. हे पाणी किचनमध्ये येते आणि किडे किचन कट्ट्यावर फिरत असतात. शक्य तेवढ्या लवकर येथे ड्रेनेजची व्यवस्था करावी.
- सरिता पाटील
---------------
गटारींचा प्रश्‍न गंभीर आहे. मागील चार वर्षांपासून हा त्रास सुरू आहे. यावर्षी गटारींचे काम झाल्याशिवाय मतदानच करणार नाही. आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत.
- लता कमळकर
-------------
पावसाळ्यात हा रस्ता बंद करावा लागतो. सायंकाळी सात वाजता डासांचे प्रमाण वाढते. अधिकारी, लोकप्रतिनिधी येतात; पण कुणीच दखल घेत नाही. दुर्गंधीमुळे मुलांचे, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
- तेजस्विनी पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com