बावड्यातील श्रीराम बागेची दुरवस्था

बावड्यातील श्रीराम बागेची दुरवस्था

00926, 83896, 00927

भगदाडे, कचरा अन् मोडकी खेळणी
बावड्यातील श्रीराम बागेची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कसबा बावडा, ता. १५ : काही वर्षापासून भाजी मंडईतील श्रीराम उद्यान दुर्लक्षित आहे. उद्यानाला दोन मोठे दरवाजे असून ते मोडकळीस आलेत. शिवाय उद्यानाच्या संरक्षक भिंतीला तीन ठिकाणी मोठी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
बावड्यात सार्वजनिक उद्यान म्हणून श्रीराम उद्यान प्रसिद्ध आहे. परंतु काही वर्षांपासून हे उद्यान दुर्लक्षित आहे. उद्यानाच्या मुख्यद्वारावरील नावाचा फलक अस्पष्ट आहे. कार्यालय बंद असून प्रवेश करताच द्वाराच्या बाजूला कचरा टाकलेला दिसतो. लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणीदेखील कचऱ्याचा खच पडला आहे. सार्वजनिक ठिकाण असूनही येथे कचरा कसा टाकला जातो, असा सवाल उद्यानात फिरावयास आलेल्या नागरिकांनी केला.
भाजी मंडईतील मुख्य ठिकाण असल्याने येथे नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. तसेच सुटीच्या दिवसांमुळे लहान मुलांना बागेत फिरायला, खेळायला घेऊन येणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. येथील काही खेळणी दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ठिकठिकाणी कचरा, बाटल्या पडलेल्या दिसतात. एकंदरीत बाग परिसराची परिस्थिती दयनीय आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घालून दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बागेची सध्याची अवस्था
- संरक्षक भिंतीला तीन ठिकाणी भगदाड
- पाण्याअभावी झाडे सुकली आहेत.
- माहितीचे फलक गायब आहेत
- सर्व पथदिवे फुटले आहेत
- पाण्याचा नळ बंद अवस्थेत
- बाकडे मोडकळीस आले आहेत
- ओपन जिमची साधने दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

------

कोट :
उद्यानाचा आढावा घेतला असून पाण्याची टाकी, मुलांसाठी खेळणी, प्रवेशद्वार, संरक्षक भिंतीचे काम येत्या काही दिवसांत पूर्ण करून घेतले जाईल. गतवर्षी बजेटमध्ये उद्यानाची तरतूद नव्हती; परंतु यावर्षी मंजुरीनुसार टप्प्याने सुधारणा करणार आहोत.
- रमेश कांबळे, उपशहर अभियंता

परिसरात स्वच्छता हवी. येथे लहान मुले खेळण्यासाठी, ज्येष्ठ नागरिक सायंकाळी फिरण्यासाठी येतात. अनेकजण रात्रीचे सहभोजन करतात आणि कचरा इथेच फेकतात. तो वाऱ्यामुळे पसरल्याने दुर्गंधी वाढते. उद्यानाची दुरुस्ती होणे आवश्यक आहे.
- अशोक गायकवाड, ज्येष्ठ नागरिक

येथील कार्यालय अनेक दिवसांपासून बंद आहे. येथे कायमस्वरूपी वॉचमन नेमणे गरजेचे आहे, जेणेकरून परिसरावर लक्ष राहील. तसेच परिसर झाडण्यासाठी कुणी महापालिका कर्मचारी येत नाहीत. ते वेळेवर आले तर परिसर स्वच्छ राहील.
- मीनल शिंदे, महिला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com