श्री. हनुमान यात्रा विशेष कोतोली, ता. पन्हाळा

श्री. हनुमान यात्रा विशेष कोतोली, ता. पन्हाळा

00586, 82850

पट्टी ः श्री हनुमान यात्रा विशेष, कोतोली (ता. पन्हाळा)

इंट्रो

पूर्वेला ऐतिहासिक वारसा लाभलेला पन्हाळा किल्ला, आग्नेय दिशेला घोड्यावर बसून गावाचे रक्षण करणारा दख्खनचा राजा श्री जोतिबा, उत्तरेला पसरलेले मसाईचे भव्य पठार आणि गावाच्या पश्चिमेकडून दक्षिणेकडे वळसा घालत आलेली कासारी नदी असा निसर्गसंपन्न वारसा लाभलेले गाव म्हणजे कोतोली होय. याच कोतोलीची श्री हनुमान चैत्र यात्रा शनिवारी (ता. ११) व रविवारी (ता. १२) होत आहे. त्यानिमित्त...
------------------------

कोतोलीचे जागृत
ग्रामदैवत श्री हनुमान

मराठी नववर्ष गुढीपाडव्याला सुरू होते. याच दिवशी कडुनिंब खाण्यासाठी सर्व मंडळी देवळात जमतात. यावेळी वर्षाचे पंचांग वाचन अरुण जोशी करतात आणि याचवेळी सर्वांच्या संमतीने यात्रेचा दिवस ठरवला जातो. अक्षय्यतृतीयेनंतर येणारा पहिला शनिवार ग्रामदैवत श्री हनुमानाच्या यात्रेचा दिवस ठरतो. ही परंपरा पूर्वीपासून आजतागायत सुरू आहे. बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार गावात वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील आदर्श गाव म्हणून कोतोलीचा लौकिक आहे.
कोतोलीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्या म्हणजे राजेशाही राजदरबारी कोतवाल म्हणून या गावचे लोक काम करत असावेत. काही वर्षांपूर्वी सापडलेल्या जुन्या प्राचीन मूर्ती आणि ग्रामदैवत हनुमानाची स्वयंभू मूर्ती ही शिवकालीन असावी अशी काहींची मते आहेत. गावात ग्रामदैवत हनुमान मंदिरासह परिसरात मसोबा मंदिर, मरगाई मंदिर, महादेव मंदिर, विठ्ठल मंदिर, संत गोरोबा मंदिर अशी विविध मंदिरे आहेत.
सहकार चळवळीच्या माध्यमातून वीस वर्षांत गावाचा मोठ्या प्रमाणात कायापालट झाला. आज गावाला छोट्या शहराचे रूप आले आहे. विविध शिक्षण संस्था, पतसंस्था, विकास संस्था, दूध संस्था, दवाखाने, मेडिकल, मॉलसह अनेक दुकाने गावात आहेत. गावात विविध जाती-धर्मांतील लोक असले तरीही कधीही भांडण-तंटा नाही. तालुक्यात गुन्हेगारीचा खटला नसलेले गाव म्हणून गावाची जिल्ह्यात ओळख आहे.
गावच्या विकासाबरोबर गावातील सलोख्याला आणि शांततेला आजवर डी. जी. पाटील आणि बळवंत पाटील या दोन गुरुजींनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. केवळ एक दिवस इलेक्शन आणि बाकी पाच वर्षं आपुलकीच्या नात्यांचे सिलेक्शन हा मंत्र गावकऱ्यांनी मनापासून जपला आहे. हाच सलोख्याचा वारसा नव्या पिढीतील माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, सज्जन पाटील, सरदार पाटील, एम. डी. पाटील ही नेतेमंडळी जपत आहेत.
सरपंच सौ. वनिता प्रकाश पाटील ग्रामपंचायतीमार्फत गावचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना उपसरपंच अजित वसंत पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुभाष पाटील, प्रशांत पाटील, गणेश पाटील, महादेव पाटील, बाबासो रेडेकर, अजित कांबळे, सुवर्णा पाटील, अंजना कराळे, विमल चौगुले, मनीषा लव्हटे, लता माने, सुरेखा कांबळे, मनीषा लव्हटे, अंजूनबी मुल्ला, ग्रामसेवक आर. जी. वळवी आणि ग्रामपंचायत कर्मचारी सहकार्य करत आहेत.
प्रशासकीय सेवेत परीक्षित पाटील, अशोक पाटील, धीरज सातपुते, बबन पाटील, संपदा पाटील, तेजस्विनी पाटील, पूजा पाटीलसारखे युवक आणि युवती यशस्वी होऊन तर काहीजण उद्योग व्यवसायात यशस्वी होऊन नव्या पिढीपुढे आदर्श ठेवत आहेत. प्रसिद्ध कंत्राटदार सोपानदादा पाटील, सागर वरपे, प्रसिद्ध विधिज्ञ सूर्यकांत चौगले तसेच पुण्यात रयत प्रबोधिनीची स्थापना करणारे विशाल सुतार हे तरुण गावाचे मानबिंदू आहेत.
सांस्कृतिक क्षेत्रातही नवी पिढी अग्रेसर राहिली आहे. संतोष फिरिंगे यांच्यासारखे उदयोन्मुख लेखक चित्रपट, कथा, कादंबऱ्या, कवितासारख्या विषयात सामाजिक भान ठेवून विपुल लेखन करीत आहेत. अजित साळवी, सुशांत सर्वगोडे ही उमद्या मनाची मुले कलेच्या प्रांतात जिल्ह्यात वेगळा ठसा उमटवत आहेत. मुंबईच्या दादासाहेब फाळके चित्र नगरीत गावचे सुपुत्र रंगराव चौगले कला दिग्दर्शक म्हणून काम करतात.
गावाला वारकरी संप्रदायाचा मोठा वारसा आहे. गावाला आध्यात्मिक अधिष्ठान देऊन अख्खी पिढी भक्तिमय करणारे ऋषितुल्य ह.भ.प. डॉ. नामदेव कळंत्रे यांचे योगदान अनमोल आहे. तुकारामबीज कार्यक्रमात गाव भजन, कीर्तनात तल्लीन होत असते. त्यामुळे विवेकशीलता आणि अध्यात्म यांचे अधिष्ठान गावाला पूर्वीपासून आहे. त्याचा चांगला परिणाम म्हणजे तरुणाई व्यसनमुक्त होत आहे. तरुण मुले रक्तदान शिबिर, पर्यावरणपूरक उपक्रम, व्याख्याने, प्रबोधन असे अनेक कार्यक्रम राबवत आहेत.
गावच्या तरुणांनी बदललेले गावच्या प्राथमिक शाळेचे रूप कौतुकाचा विषय ठरत आहे. गुरूवर्य प्राचार्य कै. दादासाहेब चौगले, पैलवानाची तिसरी पिढी घडवणारे धुळाप्पा शेलार, मारुती पाटील अशा जुन्या मंडळीनी सामाजिक आणि धार्मिक संस्कृतीचे जतन केले आहे. जुन्या पिढीतील उद्योजक संगाप्पा अण्णा सरुडकर, मुतखडासारख्या आजारावर चार दशकांपासून निरपेक्ष भावनेने सेवा केलेले (कै.) महादेव लव्हटे, डॉ. कल्लाप्पा घुगरे (मिणचेकर) यांनी केलेली गावाची सेवा सर्वश्रुत, अभिमानास्पद आहे.
यात्रेला मुख्य दिवशी देवाला अभिषेक घातला जातो. पुरणपोळीचा घरोघरी नैवेद्य असतो. कृषी परंपरा मोठी असल्याने संध्याकाळी बैलांच्या साग्रसंगीत मिरवणुका काढण्याची परंपरा आजही आहे. रात्री तमाशा फडही असतो. पाहुणे, मित्र मंडळीना मांसाहारी जेवणासह कुस्त्याचे भव्य मैदान आयोजित केले जाते.

कुस्तीची उज्ज्वल परंपरा
गावाला कुस्ती खेळाची मोठी परंपरा आहे. गावच्या तालमीतील मुलांबरोबर आता मुलीदेखील राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर यश मिळवत आहेत. पै. कृष्णात फिरिंगे, पै. गब्बर शेलार, क्रीडाधिकारी पै. अरुण पाटील, पै. सुरेश चौगले, पै. युवराज पाटील इत्यादी पैलवानांनी गावचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कुस्तीच्या आखाड्यात उज्ज्वल केले आहे. याचबरोबर श्रावणी लव्हटे, श्वेता गंधवाले, जयंती पाटील, समीक्षा शेलार, समृद्धी, साक्षी, वैष्णवी, संस्कृती, उत्कर्षा आणि अक्षरा घुगरेसारख्या लाडक्या कन्याही कुस्ती व ज्युदो खेळात गावचे नाव उंचावत आहेत.

मुंबईकर चाकरमानी यावेळी आपुलकीने गावाकडे येतात. माहेरवाशिणीही गावच्या ओढीने येतात. दोन दिवसांत जवळच्या माणसांशी आपुलकीची, सुख-दुःखाची देवाणघेवाण करतात. जुन्या-नव्या आठवणींना उजाळा देत आनंदाश्रूना वाट मोकळी करून देतात. यात्रा संपते, पालं उठतात, पाहुण्यांनी गजबजलेली घरं सुनी होतात. नव्या जुन्याची सांगड घालत गावाचे आणि गावच्या मातीचे ऋणानुबंधाचे धागे गुंफत चैत्राची नवपालवी न्यालेली यात्रा मनाला हुरहूर लावून चराचरांत नवचैतन्य आणणाऱ्या मृगाच्या ओढीने वैशाखाकडे सरकत समारोपाकडे जाते.
------------------
पुरवणी संकलन
संग्राम रंगराव पाटील,
तिरपण-कोतोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com