विद्यार्थ्‍यांच्‍या दप्‍तराला आता शनिवारी सुट्टी

विद्यार्थ्‍यांच्‍या दप्‍तराला आता शनिवारी सुट्टी

05532
संग्रहीत छायाचित्र

विद्यार्थ्‍यांच्‍या दप्‍तराला आता शनिवारी सुटी
शिक्षण विभागाचा निर्णय : अभ्‍यासाचा ताण कमी करण्‍याचा उद्देश
राजू मुजावर : सकाळ वृत्तसेवा
कुंभोज, ता. २ : विद्यार्थ्‍यांमध्‍ये त्‍यांच्‍या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्‍हावी, चांगल्‍या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्‍व गुणांचा विकास व्‍हावा या हेतूने सर्व शाळांमध्‍ये येत्‍या शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी प्रत्‍येक शनिवारी आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्‍या‍चा निर्णय राज्‍याच्‍या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
तर्कसंगत विचार आणि कार्य करण्‍यासाठी सक्षम असणाऱ्‍या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्‍मक, कल्‍पनाशक्‍ती, नैतिक मूल्‍ये असणाऱ्‍या उत्तम मनुष्‍यत्‍वाचा विकास हा नवीन राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्‍वा‍चा उद्देश आहे. लहान वयातही विद्यार्थ्‍यांना ताणतणाव, उदासिनता, नैराश्‍य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर शालेय जीवनात आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविल्‍यास विद्यार्थ्‍यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल, त्‍याचा निश्‍चितच विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्‍यांची गळती, अनुत्तीर्ण होण्‍याचे प्रमाण कमी होण्‍यास मदत होणार आहे. आनंददायी शनिवार उपक्रम सुरू झाल्‍यानंतर शाळांना शनिवारी कोणत्‍याही विषयाचे वर्ग घेता येणार नाहीत. त्‍यामुळे विद्यार्थी शनिवारी शाळेत आल्‍यानंतर त्‍यांची अभ्‍यासापासून सुटका होणार आहे. शाळेचा संपूर्ण वेळ हा आनंददायी शनिवारसाठीच करायचा आहे, असे स्‍पष्‍ट आदेशही शिक्षण विभागाने दिले आहेत. आठवड्यातून दोन दिवस त्‍यांना अभ्‍यासापासून विश्रांती मिळाल्‍यानंतर ते सोमवारी शाळेत येतील आणि त्‍यांच्‍यातील अभ्‍यास व शाळेबद्दल गोडी वाढलेली दिसणार आहे.
------------
योग, प्राणायामचे शनिवारी धडे
शाळास्‍तरावर दर शनिवारी विद्यार्थ्‍यांना प्राणायाम, योग, ध्‍यानधारणा, श्‍वसनतंत्र शिकविले जाणार आहे. आपत्ती व्‍यवस्‍थापनाची मूलतत्त्‍वे‍ व व्‍यावहारिक प्रशिक्षणाचे धडेही दिले जाणार आहेत. दैनंदिन जीवनातील वित्तीय व्‍यवस्‍थापन, आरोग्‍याचे रक्षण करण्‍यासाठीच्‍या उपाययोजना, रस्‍ते सुरक्षा, समस्‍या निराकरणाची तंत्रे, कृती खेळ यांवर आधारित उपक्रम, नातेसंबंध हाताळण्‍याचे कौशल्‍य याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
----------
उपक्रमाचा हेतू
खेळीमेळीच्‍या वातावरणातून विद्यार्थ्‍यांची शिकण्‍याची तयारी करणे,
विद्यार्थ्‍यांमध्‍ये सामाजिक, भावनिक कौशल्‍ये विकसित करणे,
विद्यार्थ्‍यांना ताणतणावाचे व्‍यवस्‍थापन करण्‍यास सक्षम बनवणे,
शालेय शिक्षण घेताना विद्या‍र्थ्‍यांचे मानसिक स्‍वास्‍थ्‍य उत्तम राखणे,
------------
शाळांमध्‍ये विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्‍यांचा भावनिक, सामाजिक विकास साधण्‍याचा प्रयत्‍न होत असतो. शिक्षणाबरोबरच त्‍या-त्‍या वयोगटानुसार विद्यार्थ्‍यांचा सर्वांगीण विकास साधण्‍यासाठी आवश्‍यक असणाऱ्या उपक्रमांचा समावेश आनंददायी शनिवारमध्‍ये करता येईल. आनंददायी शनिवार या उपक्रमांमुळे विद्यार्थ्‍यांना कृती, खेळ यातून शिक्षणाची गोडी लावण्‍यास मदत होणार आहे.
-संजय कुंभार, मुख्‍याध्‍यापक, विद्यामंदिर, तनाळी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com