
तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाबाबत निर्णय नाही!
लोगो - डॉ. दाभोलकर हत्या
तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाला
मंजुरीचा अद्याप निर्णय नाही
सीबीआयची उच्च न्यायालयात माहिती
मुंबई, ता. २० : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्वेसर्वा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाल्याच्या अहवालाला मंजुरी द्यायची की नाही, याबाबत अद्याप मुख्य कार्यालयाने निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयात सीबीआयने दिली. त्यामुळे तपास अहवाल दाखल करण्यासाठी न्यायालयाने आता आणखी चार आठवड्यांचा अवधी सीबीआयला सोमवारी मंजूर केला.
सीबीआयने या प्रकरणात तपास पूर्ण झाल्याचा अहवाल दिल्ली मुख्यालयात पाठवला आहे; मात्र अद्याप यावर निर्णय आलेला नाही. त्यामुळे सीबीआयने आणखी चार आठवडे मुदत देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ही मागणी आज मंजूर केली. सध्या या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींवर खटला सुरू झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने यावर आता कायद्यानुसार नियंत्रण ठेवू नये, अशी मागणी आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांनी याचिकेवर केली आहेच मात्र उच्च न्यायालय या प्रकरणातील पुढील तपासावर देखरेख करू शकते, असे उच्च न्यायालयाने यापूर्वी स्पष्ट केले. अद्याप या प्रकरणात काही आरोपी फरार आहेत, तर मुख्य सूत्रधार कोण, याचा छडा लागलेला नाही. त्यामुळे न्यायालयाने यावर यापुढेही देखरेख ठेवावी, अशी मागणी दाभोलकर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली.
आरोपींच्या वतीने सीबीआयला मुदतवाढ देण्यास विरोध करण्यात आला; मात्र न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने मुदतवाढ मंजूर केली. सीबीआयच्या वतीने ॲड. संदेश पाटील यांनी बाजू मांडली. सीबीआयच्या वरिष्ठ कार्यालयाशी झालेला पत्रव्यवहार देखील त्यांनी सीलबंद पाकिटात दाखल केला.