

सेन्सेक्स ७८९ अंश वाढला
मुंबई, ता. १४ : रुपया सावरण्यासाठी सरकार पावले उचलणार असल्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण आले आणि शेअर बाजार निर्देशांक एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढले. सेन्सेक्स ७८९.७४ अंश, तर निफ्टी २७७ अंश वाढला.
निर्देशांकांची ही सलग दुसरी तेजी आहे. अमेरिका व चीनच्या अध्यक्षांच्या शिखर परिषदेमुळे आर्थिक सहकार्य वाढीस लागेल, या अपेक्षेमुळेही आज जगातील सर्वच शेअर बाजारात उत्साह होता. सुरुवातीला व्यवहार सुरू झाल्यानंतर दीड-दोन तासांत शेअर बाजार घसरले होते. सेन्सेक्स ७४,५०० अंशांच्या आसपास गेला होता; मात्र तिथून त्याने जवळपास नऊशे अंश उसळी मारली. दिवसअखेर सेन्सेक्स ७५,३९८.७२ अंश, तर निफ्टी २३,६८९.६० अंशांवर स्थिरावला.
मिडकॅप निर्देशांक एक टक्का वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांक स्थिर राहिला. औषधनिर्मिती आणि आरोग्यसेवा तसेच एफएमसीजी या सुरक्षित क्षेत्रांमध्ये तेजी होती, तर चीनमध्ये धातूंना मागणी येईल या बातमीमुळे तसेच तांब्यासह अन्य धातूंच्या किमतीत वाढ झाल्यामुळे धातूनिर्मिती कंपन्यांचे शेअर वाढले होते. आयटी शेअरची घसरण आजही सुरू राहिली.
सेन्सेक्समध्ये एअरटेल साडेपाच टक्के वाढला. एटर्नल, एचडीएफसी बँक, अदाणी पोर्ट, सन फार्मा, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भाव दोन ते तीन टक्के वाढले. बजाज फायनान्स, कोटक बँक, टायटन, ट्रेंट, अल्ट्राटेक, आयटीसी, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक या शेअरचे भावही वाढले, तर दुसरीकडे इन्फोसिस अडीच टक्के, तर टेक महिंद्र दोन टक्के घसरला. एचसीएल टेक दीड टक्का, तर टीसीएस एक टक्का घसरला, हिंदुस्थान युनिलिव्हर शेअरचा भावदेखील घसरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.