
मोफत शिक्षणासाठी जिल्ह्यात ३२७० जागा
मोफत शिक्षणासाठी जिल्ह्यात ३२७० जागा
३२५ शाळांची नोंदणी; प्रवेश नोंदणीसाठी १७ मार्चपर्यंत मुदत
गणेश बुरुड : सकाळ वृत्तसेवा
महागाव, ता. ३ : मोफत शिक्षणासाठी जिल्ह्यात शाळांची नोंदणी झाली आहे. जिल्ह्यात ३२५ शाळांनी नोंदणी केली असून ३२७० जागांवर मुलांना मोफत प्रवेश मिळणार आहे. यासाठी १ मार्चपासून प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. १७ मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
आरटीई कायद्यानुसार खासगी व विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी प्रवेश देण्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यात पहिल्या टप्यात शाळांची नोंदणी झाली आहे. यावर्षी शिक्षण विभागाने प्रवेश नोंदणीसाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. कोरोनात पालक गमाविलेल्या बालकांना यावर्षी प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश मिळणार आहे. यासाठी आता १७ मार्चपर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार आहे.
या प्रवेश प्रक्रियेंतर्गत वंचित गटातील बालकाच्या प्रवेशासाठी वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी अशी अट आहे. या प्रक्रियेत पालकांनी दहा शाळांची निवड करायची आहे. अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर लॉटरी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे. मोफत शिक्षणातून प्रवेश मिळवण्यासाठी निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, मागासवर्गीय पुरावा, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना उत्पन्नाचा दाखला व दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र लागणार आहे.
-------------------
पालकांसाठी सूचना
शालेय शिक्षण विभागाने मोफत शिक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार दिलेल्या मुदतीत परिपूर्ण एकच अर्ज सादर करता येणार आहे. मोफत शिक्षणातून एकदा प्रवेश मिळाल्यावर त्या बालकाला परत प्रवेश मिळणार नाही. कोणतीही कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करू नये.