कागल-निढोरी राज्यमार्ग बनला प्रशस्त

कागल-निढोरी राज्यमार्ग बनला प्रशस्त

05336
कागल-निढोरी राज्यमार्गाचे दहा मीटरने रुंदीकरण झाले आहे. वाघजाई घाटात धोकादायक वळणांवर रुंदीकरण व संरक्षक भिंतींचे काम पूर्ण झाले आहे. (छायाचित्र ः सृष्टी फोटो, म्हाकवे)
.............
कागल-निढोरी मार्गावरील प्रवास होणार सुखकर

दहा मीटरने रुंदीकरण; वाहनधारकांतून समाधान, दुरुस्तीसाठी ५८ कोटींचा निधी खर्च

रमेश पाटील ः सकाळ वृत्तसेवा
म्हाकवे, ता. १० : कागल-निढोरी राज्यमार्ग कागल तालुक्यातील पन्नासहून अधिक गावांतील प्रवाशांच्या वाहतुकीचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून कागल, कोल्हापूर, पंचतारांकित एमआयडीसीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अरुंद मार्गामुळे अपघाताच्या वारंवार घटना घडल्या आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ५८ कोटींचा निधी मंजूर केल्याने त्यातून दहा मीटरने मार्गाचे रुंदीकरण झाल्याने वाहनधारक, प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे.
पूर्वी हा राज्यमार्ग सात मीटरचा होता, तो आता दहा मीटरचा झाला आहे. वाघजाई घाटातील धोकादायक वळणांवरील रस्त्याचे रुंदीकरण व संरक्षण भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. घाट संपल्यानंतर असलेल्या केनवडे येथील पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू आहे. निढोरी ते भडगावपर्यंतच्या चार किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणासाठी १२ कोटी ५० लाख रुपये, बामणी ते शेंडूर फाट्यापर्यंतच्या साडेतीन किलोमीटरसाठी ८ कोटी ५० लाख रुपये, तर सिद्धनेर्ली ते व्हन्नूरपर्यंतच्या पाच किलोमीटरसाठी पाच कोटी रुपये, मळगे फाटा ते केनवडे १० कोटी रुपये, केनवडे ते वाघजाई घाट पूल, रस्ता रुंदीकरण व संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी सहा कोटी रुपये, वाघजाई घाटातील रस्त्याचे रुंदीकरण तसेच समृद्धी प्रकल्पापर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण, संरक्षण भिंतीसाठी १४ कोटी रुपये असा ५८ कोटी रुपयांचा निधी या रस्त्यासाठी खर्च झाला आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावरून कोकणात तसेच गडडिंग्लज, आजरा, चंदगडसह गोव्याकडे जाणारी अवजड वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कोल्हापूर, कागल, पंचतारांकित औद्योगिक वसाहतीकडे येणारे हजारो कामगार, साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी हा प्रमुख राज्यमार्ग असल्याने या मार्गचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमांमाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. दर रविवारी व अमावास्येच्या दिवशी या मार्गावर वाहनांची व प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. तसेच हा रस्ता पुणे-बंगळूर महामार्गाला जोडल्याने मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच गोवा राज्यात वाहतुकीसाठी जाणारी वाहने महामार्गावरील महाराष्ट्र व कर्नाटकातील नाके चुकवण्यासाठी या मार्गाने जातात. सावंतवाडी, गोव्याकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूकही या मार्गावरून होते. मार्गाचे रुंदीकरण झाल्याने प्रवास सुकर होणार आहे.
.....
कोट...
कागल-निढोरी राज्यमार्गाचे दहा मीटरने रुंदीकरण झाले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रस्त्याच्या रुंदीकरण व डांबरीकरणासाठी ५८ कोटी रुपयांचा निधी दिल्याने या प्रमुख मार्गाचे रुंदीकरण पूर्ण करता आले. रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे. वाघघाई घाटातील वळणावरील धोकादायक ठिकाणी रस्त्याचे, पुलाचे रुंदीकरण व संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
- डी. व्ही. शिंदे
सार्वजनिक बांधकाम, कागल
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com