
उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान
उत्रेत गव्याच्या कळपाकडून पिकांचे नुकसान
माजगाव : उत्रे (ता. पन्हाळा) येथील डोंगराळ भागात निकमवाडी उदाळवाडी परिसरातील ‘वांजुळे दरा’ नावाच्या शेतात गव्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. गव्यांनी ऊस, मक्का, भुईमूग, सूर्यफूल, भाजीपाला आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, गव्यांपासून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. वनखात्याने या गव्यांचा बंदोबस्त करावा व नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या परिसरात दिवसाही गव्यांचा वावर वाढला आहे. गव्यांच्या भीतीने शेतकरी शेतात जाण्यास टाळाटाळ करत असून, शेतीची कामे खोळंबली आहेत. उन्हाळा सुरू झाला असून, ऊस पिकासह इतर पिकांना जादा पाण्याची गरज भासत आहे. शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेताकडे जात नाहीत. जीव मुठीत घेऊन शेताकडे जात आहेत. त्यामुळे वनविभागाने तातडीने याबाबत उपाययोजना राबवून कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.