पन्हाळ्यात ८५ अंगणवाड्या इमारतीविनाच

पन्हाळ्यात ८५ अंगणवाड्या इमारतीविनाच

87945
माजगाव ः माजगावपैकी माळवाडीत इमारतीअभावी सहकारी दूध संस्थेत अंगणवाडीतील बालके शिक्षण घेत आहेत.
........
पन्हाळ्यात ८५ अंगणवाड्या इमारतीविनाच

५२ भाड्याच्या इमारतीत; ‘आनंददायी शिक्षण’ संकल्पनेला हरताळ

सागर चौगले ः सकाळ वृत्तसेवा
माजगाव, ता. ५ ः पन्हाळा तालुक्यात ३४७ अंगणवाड्या आहेत. त्यापैकी ५२ अंगणवाड्या भाड्याच्या खोल्यांमध्ये भरत आहेत. ८५ अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीच्या इमारतीच नाहीत. त्यामुळे समाजमंदिर, शाळा, वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालयात दाटीवाटीने त्या भरवल्या जातात. एकीकडे अंगणवाडी सेविकांच्या हातात मोबाइल येऊन अंगणवाड्या स्मार्ट होत आहेत, तर दुसरीकडे बालकांना बसण्यासाठी सुरक्षित इमारतीच नाहीत.
अंगणवाडी म्हणजे शिक्षणाचा ‘श्री’ गणेशा. मात्र, स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही शिक्षणाच्या मूलभूत सुविधांसाठी अंगणवाडीत शिकणाऱ्या कोवळ्या बालकांची फरफट सुरूच आहे. मुलांना वेगवेगळे आकार कळावेत, रंग-आकारांनुसार वर्गीकरण करता यावे, स्पर्शातला-चवीतला-वासातला फरक कळावा, लेखनासाठी मुलांच्या बोटांचे स्नायू विकसित व्हावेत, नजर आणि हात यांचे योग्य समायोजन व्हावे, चालताना तोल सांभाळता यावा, अशा विविध शारीरिक, बौद्धिक क्षमतांच्या विकासासाठी तक्ते, गोट्या, विविध आकारांमधील कोडी, मणी-दोरे अशा मुलांना रमवणाऱ्या गोष्टी अंगणवाडीत असतात.
या सर्वांसाठी तालुक्यात ३४७ पैकी फक्त २१० अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती आहेत. ५२ अंगणवाड्या प्रतिमहा एक हजार रुपये दराने भाड्याच्या खोलीत आहेत. ८५ अंगणवाड्यांना स्वमालकीच्या इमारती नाहीत. या ८५ अंगणवाड्या समाजमंदिर, शाळा, वाचनालय, ग्रामपंचायत कार्यालयात भरतात. २० ते २५ मुले तिथे दाटीवाटीने बसून शिक्षणाचा श्रीगणेशा करत आहेत. उसन्या जागेत अंगणवाड्या भरवून ‘आनंददायी शिक्षण’ संकल्पनेला हरताळ फासला जात आहे. तालुक्यातील किसरूळ, जाखले, सावर्डे, असंडोली, मरळी व गोलीवडे पैकी जाधववाडी गावांतील नवीन अंगणवाडी इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लवकरच त्या नव्या इमारतीत अंगणवाडी भरविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
..............
कोट...
अंगणवाडी इमारतीसाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून जागा उपलब्ध करून दिली जात नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी इमारती होऊ शकल्या नाहीत. जागेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यापेक्षा मागणी करणाऱ्यांनी जागेची जबाबदारी पूर्ण करावी.
नयना पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी, पं. स., पन्हाळा
....
दृष्टिक्षेपात अंगणवाड्या .......
*एकूण अंगणवाड्या : ३४७
*स्वमालकीच्या इमारतींत अंगणवाड्या : २१०
*भाड्याच्या जागेतील अंगणवाड्या : ५२
*स्वमालकीच्या इमारती नसलेल्या अंगणवाड्या : ८५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com