
वारूळ (ता. शाहूवाडी ) येथे गॅस टँकरला आग
वारूळः येथे गॅस टॅंकरचा झालेला अपघात
...
गॅस टँकर झाडावर
आदळून केबिन खाक
वारुळ येथील दुर्घटना; कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहतूक कोंडी
शाहूवाडी, ता. १३ : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वारुळ (ता. शाहूवाडी) येथे गॅस टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर झाडावर आदळला. यामध्ये टँकरची केबिन जळून खाक झाली. अग्निशामक दल व स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. चालक चांगदेव माधवराव चाटे (वय ४५, रा. परभणी) हे जखमी झाले.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गॅस टँकर (केए ०१ एएच ०३५३) रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जात होता. वारुळ गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर रस्त्याकडेच्या आंब्याच्या झाडावर आदळला. टँकरची झाडाला जोराची धडक बसताच ड्रायव्हर केबिनने पेट घेतला. काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. टँकरमध्ये सुमारे ३५ हजार लिटर गॅस भरलेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून वारुळ गावातील प्राथमिक शाळा, नागेश्वर हायस्कूल व नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर घोटणे येथे पोलिस व प्रशासनाने स्थलांतरित केले. आग आटोक्यात आणण्यासाठी मलकापूर, पन्हाळा नगरपरिषद व वारणा साखर कारखाना यांचे अग्निशामक बंब बोलावण्यात आले. अपघातामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुमारे आठ तास वाहतूक कोंडी झाली होती. मलकापूरचा आठवडी बाजार असल्याने त्यात अधिक भर पडली होती. जखमी चालकावर मलकापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आले.
घटनास्थळी तहसीलदार गुरु बिराजदार, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा पाटील, उपनिरीक्षक प्रियंका सराटे, तालुका वैद्यकीय अधिकारी एच. आर. निरंकारी उपस्थित होते.