
ऐनवाडी पैकी धनगरवाडा रेशीम उद्योगाच गाव -खासदार माने
01970
शाहूवाडी : ऐनवाडी पैकी धनगरवाडा (ता. शाहूवाडी) येथील कार्यक्रमात बोलताना खासदार धैर्यशील माने. या वेळी उपस्थित मान्यवर.
ऐनवाडी धनगरवाडा बनले जंगल रेशीमचे गाव
वनविभागाकडून बहुमान; टसर रेशीमच्या आधारे प्रकल्प राबविणार
शाहूवाडी, ता. १२ : ऐनवाडी पैकी धनगरवाडा (ता. शाहूवाडी) गावची ओळख रेशीम उद्योगाचे आणि स्थानिकांना रोजगार देणार गाव अशी तयार करा. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करू असे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी दिले. कोल्हापूर वन विभाग, वनपरिक्षेत्र मलकापूर, वन व्यवस्थापन समिती ऐनवाडी धनगरवाडा यांच्यातर्फे ऐनवाडी धनगरवाडा गावाला जंगल रेशीमचे गाव म्हणून बहुमान देण्याचा सोहळा झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
खासदार माने म्हणाले, ‘‘कोल्हापूर जिल्हा हा रेशीमचा जिल्हा म्हणून पुढे येणार आहे. रेशीम उद्योगासाठी आवश्यक असणारी अंडी बँक या ठिकाणी उभी करू. येथील नैसर्गिक वातावरण पोषक आहे. या संधीचा फायदा घ्या. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या नावीन्यपूर्ण प्रकल्पासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे.’’
मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांनी प्रकल्पाविषयी आवश्यक असणाऱ्या बाबी आणि कशा पद्धतीने हा प्रकल्प उभा राहिला याविषयी माहिती दिली. डॉ. योगेश फोंडे यांनी टसर रेशीमबाबत राबवलेली संकल्पना व यापुढे करावयाची उपायोजना व राबवले जात असलेले प्रकल्प याची माहिती दिली.
या वेळी वनक्षेत्र संचालक एन. एस. लडकत, सहायक वनसंरक्षक गणेश पाटोळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, वन अधिकारी नंदकुमार नलवडे, अमित भोसले उपस्थित होते.