मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Published on

51983-1
मुंबई ः पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना बुधवारी चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

मराठी चित्रपटांसाठी सर्व सुविधा एकाच ठिकाणी
फडणवीस : राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण
मुंबई, ता. ९ : चित्रपट निर्मितीसाठी सर्व सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेटस्‌ एकाच ठिकाणी उपलब्ध केले जातील. तसेच मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार केला असून, तो लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.
६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पं. हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, अभिनेता प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला. याशिवाय उत्कृष्ट कलादिग्दर्शन, उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट संकलन, उत्कृष्ट ध्वनिमुद्रण, उत्कृष्ट ध्वनिसंयोजन, उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट रंगभूषा, उत्कृष्ट बालकलाकार इत्यादी पुरस्कारही प्रदान करण्यात आले.
-
रामटेक, नाशिक येथे नव्या फिल्म सिटी!
महाराष्ट्राची आणि मुंबईची ओळख चित्रपट नगरी म्हणूनही जगभरात आहे. मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या माध्यमातून महाराष्ट्राने चित्रपटसृष्टीला समृद्ध परंपरा दिली आहे. या परंपरेला पुढे नेत मुंबईतील फिल्म सिटी, एन. डी. स्टुडिओ, कोल्हापुरातील चित्रीकरण सुविधेनंतर रामटेक व नाशिक येथे नवीन फिल्मसिटी उभारण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी सांगितले.
-----
संत ज्ञानेश्वरांप्रमाणे आयुष्यात आलेल्या दुःखाचे रूपांतर कलेत, संगीतामध्ये आणि समाजोपयोगी कार्यात करणे, हीच माझी साधना राहिली आहे. दुःखाचा विषाचा प्याला स्वीकारून त्याचे अमृतात रूपांतर करणे, हाच माझ्या जीवनप्रवासाचा सार आहे.
- पंडित हृदयनाथ मंगेशकर, ज्येष्ठ संगीतकार
--
मी १२५ व्या चित्रपटाच्या उंबरठ्यावर असताना हा विशेष योगदार पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्य समजतो. माझा हा पुरस्कार मला दिग्दर्शनाची संधी दिलेल्या सर्व दिग्दर्शकांना समर्पित करतो.
- प्रसाद ओक, अभिनेते
-
माझ्यासाठी महाराष्ट्र हे फक्त राज्य नाही, तर माझी जन्मभूमी, कर्मभूमी आणि आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. महाराष्ट्राकडून मिळणारा हा सन्मान माझ्यासाठी विशेष आणि अभिमानास्पद आहे.
- राणी मुखर्जी, अभिनेत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com