
मुरगूडच्या नंदिनी,अमृता व रोहनला कुस्तीत सुवर्णपदके.
03360
पुणे : बालेवाडीतील यशस्वी महिला व पुरुष मल्लांसोबत साई आखाड्याचे कोच दादा लवटे.
मुरगूडच्या नंदिनी,अमृता, रोहनला कुस्तीत सुवर्णपदके
पुण्यात मिनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा; साई आखाड्याच्या मल्लांकडून पदकांची लयलूट
मुरगूड, ता. ३ : शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, पुणे येथील महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक (मिनी ऑलिम्पिक) क्रीडा स्पर्धेत महिला गटात मुरगूडच्या नंदिनी बाजीराव साळोखे हिने ५० किलो वजनगटात तर ६५ किलो वजन गटात अमृता शशिकांत पुजारी हिने सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुष गटात रोहन रंडे याने ९७ किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. साई आखाड्याच्या मल्लांनी तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कास्यपदकाची कमाई केली.
यशस्वी मल्ल लोकनेते सदाशिवराव मंडलिक राष्ट्रीय (साई) कुस्ती संकुल, डॉर्प कॅटल ग्रुप व ऍडॉप्ट कंपनीचे दत्तक कुस्तीगीर आहेत. नंदिनीने सातारा, रायगड व जय मल्हारच्या महिला कुस्तीगीरांना पराभूत केले. अंतिम लढतीत तिने कोल्हापूर शहर विभागातून प्रतिनिधित्व केलेल्या नेहा किरण चौगुले हिला पराभूत करुन सुवर्णपदक मिळविले. नेहा चौगुले ५० किलो गटात रौप्यपदकाची मानकरी ठरली. अमृता शशिकांत पुजारी हिने ६५ किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. या फेरीत कोल्हापूरच्या सृष्टी भोसलेला तांत्रिक गुणाधिक्याने पराभूत करुन सुवर्णपदकाची कमाई केली.
अंजली आनंदराव पाटील हिने ५५ किलो गटांत रौप्यपदक मिळविले. अंजलीने रायगड, पुणे व सातारा जिल्ह्यातील कुस्तीगिरांचा पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. तिला अंतिम फेरीत विश्रांती पाटीलकडून पराभव पत्करावा लागला. ५९ किलो गटात अंकिता आनंदा शिंदे हिने रौप्यपदक मिळवले.
अंतिम फेरीत तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेती भाग्यश्री फंडबरोबरच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. सायली राजाराम दंडवते ७२ किलो गटात रौप्यपदक मिळविले. पुरुष विभागात रोहन रंगराव रंडे याने ९७ किलो गटात सुवर्णपदक मिळवले. विजय जिजाबा डोईफोडे हा ८७ किलो गटात कास्यपदकाचा मानकरी ठरला.