'' शिक्षक '' होण्याचे '' स्वप्न '' भंगणार ?

'' शिक्षक '' होण्याचे '' स्वप्न '' भंगणार ?

शिक्षक होण्याचे स्वप्न भंगणार?
निवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी भरतीचे आदेश; नव्या आदेशाने बेरोजगार हवालदिल

प्रकाश तिराळे : सकाळ वृत्तसेवा

मुरगूड, ता. १० : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्तीचे आदेश शासनाने काढले. त्यामुळे पदव्या घेऊन नोकरीच्या शोधात असणाऱ्या राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांचे ‘शिक्षक’ होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाल्याने ते हवालदिल बनले आहेत.
राज्यात अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थी खासगी शाळेत शिक्षण घेताना दिसताहेत. अनेक शाळा एकशिक्षकी बनल्या आहेत. शासनाच्या नव्या आदेशानुसार नियोजित शिक्षक भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयातील दाखल रिट याचिकांमुळे विलंब होत असल्याचे कारण देत शासने पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खासगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील निवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकी पदे भरली जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागवून नियुक्त्या करुन त्यांना २० हजार मानधन दिले जाणार आहे. राज्यातील लाखो बेरोजगार पदवी घेवून भरतीकडे डोळे लावून बसले आहेत. नोकरीअभावी अनेकांनी एमआयडीसीची वाट धरली आहे. अनेकजण शेती व तत्सम व्यवसाय करत आहेत. भरती आज होईल,उद्या होईल यामध्ये अनेकांचे नोकरीचे आणि लग्नाचे वय सरुन जात आहे. याला जबाबदार कोण? ज्यांना नोकरीची खरी गरज आहे, त्यांना नोकरी नाही आणि ज्यांना चरितार्थ चालवण्यासाठी पेन्शन आहे, त्यांना पुन्हा नोकरी. या निर्णयाने निवृत्त शिक्षक कामाला पुन्हा लागतील; पण बेरोजगारांचे काय? हा सवाल उपस्थित होतो.
.....
चौकट :
बेरोजगारीत भर
३१ मे रोजी अनेक शिक्षक निवृत्त झाले. यातील बहुतांशी शिक्षक नव्याने दाखल होऊ शकतात. तसेच अन्य काहीजण सेवेत उतरतील. यामुळे शिक्षण क्षेत्रातील कमतरता भरुन निघेलही. पण या दरम्यान अनेकजन वयाअभावी नोकरीपासून दूर फेकले जातील त्याचे काय? यामुळे बेरोजगारीची समस्या आणखी गंभीर होईल.
.....
कोट :
शिक्षकांची बरीचशी पदे रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने तात्पुरती सोय करण्यासाठी ही भरती करण्याचे ठरवले आहे. अद्याप वरिष्ठ पातळीवरुन सूचना आलेल्या नाहीत.सूचना येताच कार्यवाही केली जाईल.
- डॉ. गणपती कमळकर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कागल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com