प्लास्टिक, कचऱ्यासह ट्रकभर गाळाची उचल

प्लास्टिक, कचऱ्यासह ट्रकभर गाळाची उचल

04426
मुरगूड : येथील वेदगंगा नदीत मिसळणाऱ्या ओढ्यातील कचरा काढण्याचे काम करताना सर्जेराव भाट व नगरपरिषदेचे कर्मचारी.
.............
प्लास्टिक, कचऱ्यासह ट्रकभर गाळाची उचल

मुरगूडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांसह न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
मुरगूड, ता. २३ : शहराच्या उत्तरेला वाहणाऱ्या वेदगंगा नदीजवळील कुरणी बंधाऱ्यानजीक नदीत मिसळणाऱ्या ओढ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्यांसह अन्य कचरा साचून राहिला होता. गुरुवारी दिवसभर सामाजिक कार्यकर्ते व नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक बाटल्या, टाकाऊ कचऱ्यासह ट्रकभर गाळ काढला.
वेदगंगा नदीपासून अगदी ५०० मीटर अंतरावर ओढ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, औषधे, कीटकनाशके यांच्या बाटल्या, टाकाऊ वस्तू यासह कचऱ्याचा जणू बांधच तयार झाला होता. पावसाळा तोंडावर आल्याने हा सर्व कचरा नदीत वाहून जाणार, ही बाब सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांच्या लक्षात आली. त्यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागास याची कल्पना दिली. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शहरातील शिवभक्त स्वयंसेवकांच्या कानावर ही गोष्ट घालून भाट यांनी स्वतःच हा कचरा बाहेर काढायचे ठरविले. त्यानुसार शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार गुरुवारी भल्या पहाटे ओढ्यात मिळसणारे दुर्गंधीयुक्त पाणी, घाण याची तमा न बाळगता भाट यांच्या पुढाकाराने ओढ्यात उतरून कचरा साफ करण्याचे काम हाती घेतले. शिवभक्त स्वयंसेवक व नगरपरिषदेच्या स्वच्छता कामगारांनी कामाला सुरुवात केली. हा हा म्हणता प्लास्टिक बाटल्या, टाकावू कचऱ्यासह ट्रकभर गाळ ओढ्यातून बाहेर काढून ओढ्याचे पात्र स्वच्छ केले. नदीत सांडपाणी मिसळणाऱ्या या ओढ्यातील गाळ काढून नदी प्रदूषित होण्यापासून रोखण्याचे काम करणाऱ्या युवक व पालिका कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. या कामात सर्जेराव भाट व नगरपरिषेच्या स्वच्छता विभागाचे मुकादम बबन बारदेस्कर यांनी पुढाकार घेतला. त्यांना भिकाजी कांबळे, मोहन कांबळे, ओंकार पोतदार, राजू कांबळे, दत्ता बरकाळे,
साताप्पा कांबळे, दिलीप पाटील, किसन कांबळे, विक्रम कांबळे आदींनी साथ दिली.
.,..
कोट :
केवळ ओढ्याची स्वच्छता करून भागणार नाही, तर नदीकाठी चालणाऱ्या ओल्या पार्ट्यांवरही बंदी घातली पाहिजे. खरकट्या पत्रावळ्यांचे ढीगही वेदगंगा नदीकाठावर पाहायला मिळतात. ज्या गावांना वेदगंगा नदीतील पाण्याचा पिण्यासाठी उपयोग होतो, ती नदी स्वच्छ ठेवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांनी मानसिकता बदलली पाहिजे.
सर्जेराव भाट, मुरगूड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com