
ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नितीन गडकरींना निवेदन
ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे
नितीन गडकरींना निवेदन
नागाव, ता. २९ : ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या मागण्यांबाबत केंद्र शासन सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ट्रान्स्पोर्ट असोसिएशन ऑफ नागाव, शिरोलीतर्फे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. माजी आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे अध्यक्ष कुलभूषण कोळी यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका ते कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत दरम्यान सुमारे पाचशे ट्रान्स्पोर्टधारक कार्यरत आहेत; मात्र एकही वाहनतळ नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. रात्रीच्या अंधारात या वाहनातील डिझेल, बॅटरी, तसेच वाहनचालकांकडे असणारी रोकड, मोबाईल आदी वस्तूंची चोरी होते. त्यामुळे वाहनधारकांना सुरक्षित व सोयी-सुविधा असणारे अद्ययावत वाहनतळ उभारण्यात यावे.
वाहनधारकांना माल भरताना व उतरून घेताना हमाली मागितली जाते. त्याऐवजी ज्याचा माल त्यानेच हमाली द्यावी. महामार्ग सहापदरीकरणात वाहनधारकांसाठी ठराविक अंतराने विसावा थांबा असावा. ज्याचा माल आहे, त्यानेच ट्रान्झिट गुडस् इन्शुरन्स करावा. वारंवार होणारी दरवाढ थांबविण्यासाठी डिझेल, पेट्रोल व सीएनजीचा जीएसटीमध्ये समावेश करावा. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये दर वर्षी होणारी वाढ रद्द करून नवीन इन्शुरन्स उतरवण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मिळावी.
मुदत संपूनही सुरू असणारे टोल नाके बंद करावेत व फास्टटॅग सुविधा अधिक सुलभ करावी. महामार्गावर लावण्यात आलेल्या मोबाईल कॅमेरा व्हॅनमुळे ऑनलाईन केसेसच्या माध्यमातून होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. आरटीओ व ट्रॅफिक पोलिस यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी कारवाई करावी. निवेदनावर अध्यक्ष कुलभूषण कोळी, उपाध्यक्ष जावेद पुणेकर, मन्सूर नदाफ, सचिव महेंद्र पाटील यांची स्वाक्षरी आहे. या वेळी दिलीप शिरोळे, राहुल चौगुले आदी उपस्थित होते.