
जोतिबा वरील गुलालाचा प्रश्न विधानसभेत ...
केमिकलयुक्त गुलाल
विकणाऱ्यांवर कारवाई करा
आमदार महेश शिंदे यांची विधानसभेत मागणी
जोतिबा डोंगर, ता.१६ः दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेत उधळला जाणाऱ्या केमिकलयुक्त गुलालाचा प्रश्न आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत उपस्थित करून फलोत्पादन मंत्र्यांचे लक्ष वेधले.
प्रशासनाने मागील चैत्र यात्रेपासून केमिकलयुक्त गुलालावर बंदी घातली आहे. परंतु डोंगरावर त्याची अंमलबजावणी पूर्ण क्षमतेने करण्यात आलेली नाही. डोंगरावर येणारा केमिकलयुक्त गुलाल भाविकांच्या आरोग्याला हानिकारक आहे .
आमदार शिंदे म्हणाले की,‘ महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतील भाविकांचे कुलदैवत श्री जोतिबा आहे. या ठिकाणी यात्रेत मोठ्या प्रमाणात गुलाल उधळला जातो. हा गुलाल तयार करण्यासाठी हानीकारक अशी केमिकल्सचा वापर करण्यात येतो. हाच गुलाल भाविक अंगावर उधळतात. त्यामुळे भाविकांना श्वसन रोग, त्वचारोग होण्याचा धोका आहे. त्यामुळे केमिकलयुक्त गुलाल विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.’ आमदार महेश शिंदे यांनी विधानसभेत हा प्रश्न मांडल्यामुळे चैत्र यात्रेपूर्वी केमिकलयुक्त गुलालावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे . दरम्यान, दैनिक ‘सकाळ’ने केमिकलयुक्त गुलालाविषयी सोमवारी (ता. १३) बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी अनेक भाविकांनी सोशल मीडियावर व्हायरल केली होती.