धरणग्रस्‍तांचे सोमवार पासून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धरणग्रस्‍तांचे सोमवार पासून आंदोलन
धरणग्रस्‍तांचे सोमवार पासून आंदोलन

धरणग्रस्‍तांचे सोमवार पासून आंदोलन

sakal_logo
By

धरणग्रस्‍तांचे कोल्हापुरात
सोमवारपासून आंदोलन
डॉ. पाटणकर; कोयनानगर, बामणोलीतही ठिय्‍या
सातारा, ता. २४ : विकसनशील पुनर्वसनासह इतर प्रलंबित मागण्‍यांकडे शासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी सातारा, सांगली, कोल्‍हापूर जिल्ह्यांतील धरणग्रस्‍त सोमवारपासून (ता. २७) ठिय्‍या आंदोलन करणार आहेत. जावळी-महाबळेश्‍‍वरातील धरणग्रस्‍त बामणोली येथे उर्वरित सातारा, तसेच सांगलीच्‍या काही तालुक्‍यांतील धरणग्रस्‍त कोयनानगर, तर कोल्‍हापूर व सांगलीच्‍या सीमावर्ती तालुक्‍यांतील धरणग्रस्‍त कोल्‍हापूर जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्‍या मारणार आहेत. आठ दिवसांत मागण्‍यांबाबत सरकारने योग्‍य तोडगा न काढल्‍यास हे आंदोलन नंतर राज्‍यव्‍यापी करण्‍यात येणार असल्‍याची माहिती श्रमिक मुक्‍ती दलाचे अध्‍यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी शरद जांभळे, प्रकाश भातुसे, शंकर पन्‍हाळकर, कॉ. संपत देसाई, संतोष गोटल आदी उपस्‍थित होते. डॉ. पाटणकर म्‍हणाले, ‘६२ वर्षे झाली तरी कोयना धरणग्रस्‍तांच्‍या पुनर्वसनाचे प्रश्‍‍न अद्यापही पूर्णतः निकाली काढण्‍यात शासनाला यश आले नाही. पुनर्वसनाबाबत असणाऱ्या कायद्यांत काही बदल करण्‍यात आले असून, यामुळे धरणग्रस्‍त उद्‌ध्‍वस्‍त होणार आहेत. या बदलाला विरोध, तसेच पुनर्वसनाचे प्रश्‍‍न तत्काळ निकाली काढावेत, अशी मागणी आहे. प्रकल्‍पासाठी सर्वस्‍व त्‍यागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनेक वेळा शासनपातळीवर बैठक झाल्‍या. बैठकीतील निर्णय धाब्‍यावर बसवून पुनर्वसन प्रक्रिया रखडवण्‍यात आली आहे. या प्रक्रियेत सुधारणा केल्‍याशिवाय कोयना धरणग्रस्‍तांचे प्रश्‍‍न निकाली निघणार नाहीत. पात्र प्रकल्‍पग्रस्‍तांचे संकलन रजिस्‍टर पूर्ण करणे, जमीन निश्‍चितीच्‍या मूळ कायदा कायम करावा, धरणग्रस्‍तांकडून वसुली करण्‍याच्‍या घेतलेल्‍या निर्णयाला स्‍थगिती द्यावी आदी मागण्‍या वारंवार शासनाकडे करण्‍यात येत होत्‍या. मागण्‍या करूनही त्‍याकडे दुर्लक्ष होत असल्‍याने, तसेच धरणग्रस्‍तांचे हक्क नाकारण्‍यात येत असल्‍याने हे आंदोलन करण्‍यात येत आहे. आंदोलकांच्‍या मागण्‍यांबाबत आठ दिवसांत तोडगा न निघाल्‍यास संपूर्ण राज्‍यभरात त्‍याच धर्तीवर आंदोलन सुरू होईल, असेही डॉ. पाटणकर यांनी सांगितले. या आंदोलनात समाजातील विविध घटकांनी सहभागी होण्‍याचे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.