मकरंद पाटील दादांसोबत

मकरंद पाटील दादांसोबत

Published on

अजित पवार गोटात
मकरंद पाटील दाखल
सातारा, ता. ८ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार शरद पवार यांच्या गाडीतून प्रवास करणारे आमदार मकरंद पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वाई, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या सुमारे २५० कार्यकर्त्यांसह देवगिरी बंगल्यावर जाऊन निर्णय जाहीर केला. मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याची घोषणा अजित पवार यांनी केली. त्यामुळे जिल्ह्यात अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’त आता तीन आमदारांचा समावेश झाला आहे.
मकरंद पाटील यांचे नाव अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत होते. त्यांचे नाव मंत्रिपदाच्या यादीतही होते; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी पाटील घराण्याशी असलेल्या भावनिक जवळिकीमुळे मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतो, असे अजित पवार यांना सांगितले होते. त्यामुळे ते काय निर्णय घेणार, याची उत्सुकता जिल्ह्यात होती. याच दरम्यान, कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी खासदार शरद पवार आले होते. त्या वेळी वेळे येथूनच त्यांच्या गाडीत बसून आमदार मकरंद पाटील आले होते. त्यांनी सर्वांना धक्का देत आज चर्चेला पूर्णविराम दिल्याचे दाखवून दिले; पण त्यानंतर वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर सर्वांनीच किसन वीर कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी मकरंद पाटील यांनी अजित पवारांबरोबर जावे, असा सूर निघाला. त्यामुळे मकरंद पाटील द्विधा मनःस्थितीत होते.
आजच ते जिल्हा बॅंकेच्या संचालकांबरोबर युरोपच्या १८ दिवसांच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. त्यामुळे ते, वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यांतील सुमारे २०० ते २५० कार्यकर्त्यांसह देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर अजित पवार व मकरंद पाटील यांनी सुमारे तासभर बंद खोलीत चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.