कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे सापडले मोबाईल

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे सापडले मोबाईल

दोन तुरुंगाधिकाऱ्यांसह ११ कर्मचारी बडतर्फ
कळंबा कारागृहात मोबाईल सापडल्याप्रकरणी कारवाई

सकाळ वत्तसेवा
पुणे, ता. २९ : कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहामधील तब्बल ७५ हून अधिक कैद्यांकडे मोबाईल सापडल्याप्रकारणी कारागृह प्रशासनाने दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तर, कारागृह अधीक्षक दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांची बदली केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांकडे मोबाईल सापडल्याचे प्रकार सातत्याने समोर येत होते. त्यामुळे कारागृह प्रशासनाने कैद्यांची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १५ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक नेमले होते. पथकाने कारागृहातील कैद्यांची झडती घेतली. तपासणीत महिनाभरात ७५ हून अधिक कैद्यांकडून मोबाईल आणि सीमकार्ड जप्त करण्यात आली. कैद्यांनी बराकी आणि स्वच्छतागृहात मोबाईल लपविले होते. याबाबत कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कळंबा कारागृहात इतक्या मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि सीमकार्ड आढळून आली. अतिरिक्त महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कर्तव्यात कसूर करणाऱ्या दोन तुरुंग अधिकाऱ्यांसह ११ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार कारागृह उपमहानिरीक्षक (पश्‍चिम) स्वाती साठे यांनी ही कारवाई केली.

बडतर्फीचा प्रस्ताव सरकारकडे
कळंबा कारागृहाचे अधीक्षक पांडुरंग भुसारे यांची येरवडा कारागृहात, तर उपअधीक्षक साहेबराव आडे यांची सोलापूर कारागृहात बदली केली आहे. अधीक्षक दर्जाच्या या दोन्ही अधिकाऱ्यांवरील बडतर्फीच्या कारवाईचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.

बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे
तुरुंग अधिकारी सोमनाथ म्हस्के, सतीश कदम, कर्मचारी तानाजी गायकवाड, अभिजित गोसावी, वैभव पाटील, रवी पवार, अनिकेत आल्हाट, सुहास वरखडे, संजय टिपुगडे, स्वप्नील हांडे, वैशाली पाटील.

कळंबा कारागृहामधील केलेल्या तपासणीत कैद्यांकडे मोबाईल आढळून आले आहेत. या प्रकरणी ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. कारागृह प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे.
- अमिताभ गुप्ता,
अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com