शासकीय जमिनीत अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मदरस्यावर प्रशासनाचा  हातोडा.

शासकीय जमिनीत अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मदरस्यावर प्रशासनाचा  हातोडा.

03880
पावनगड (ता. पन्हाळा) ः शासकीय जमिनीत अतिक्रमण करून बांधलेल्या याच मदरशावर शनिवारी प्रशासनाने कारवाई केली.
3879
पावनगड ः येथे शासकीय जमिनीत अतिक्रमण करून बांधलेल्या मदरशावर शनिवारी प्रशासनाने कारवाई केली.


पावनगडावरील बेकायदा मदरशावर कारवाई
महसूल, पन्हाळा पालिका, पोलिसांच्या संयुक्त पथकाने इमारत हटविले

सकाळ वृत्त सेवा
पन्हाळा, ता.६ ः किल्ले पन्हाळगडपासून काही अंतरावर असणाऱ्या पावनगडावरील दारुल उलुम (पावनगड) या संस्थेच्या अरबिया झिनतुल कुराण मदरसावर आज महसूल, नगरपरिषद आणि पोलिस यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करण्यात आली. मदरसा शासकीय मुलकीपड जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधलेला होता व तो गेल्या ४३ वर्षांपासून सुरू होता. ती इमारत या पथकाने हटविली.

ऐतिहासिक पावनगडावर जाण्यासाठी किल्ले पन्हाळागडावरूनच जावे लागते. पावनगडावरील या सरकारी मुलकीपड जमिनी (रि.स.नं.१२८) तील वादग्रस्त मदरशात उत्तर प्रदेश, बिहार व पश्चिम बंगालमधील मुलांना शिक्षण दिले जात होते. काही संघटनांनी मदरशाबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर कागदपत्रांची पडताळणी, जमिनीची रीतसर मोजणी, अतिक्रमण केलेल्या संस्थाचालकाबरोबर बैठका घेणे आदी कार्यवाही गेले काही दिवस सुरू होती. सर्व पातळीवर पडताळणी करून प्रशासनाने अतिक्रमणाची खात्री करून घेतली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५३ अन्वये अतिक्रमण काढून घेण्याबाबत संस्थेला सहा महिने मुदतीची नोटीस दिली होती; पण अतिक्रमण करणाऱ्या संस्थेने दिलेल्या मुदतीत अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रशासनाने कारवाईबाबतच्या हालचालींना गती दिली. वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन गेल्या चार- पाच दिवसांत गोपनीय पद्धतीने अतिक्रमण काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासूनच अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले. त्या दिवशी दुपारी मदरसा संचालकांना तेथील मुलांना अन्यत्र स्थलांतरित करण्याची सूचना पोलिस प्रशासनाने दिली होती. त्याप्रमाणे तेथील ३९ मुलांना शिरोली येथील मदरशामध्ये स्थलांतरित केले. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पन्हाळगडावर पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणात पोलिसांची कुमक मागविली होती. शुक्रवारी रात्री उशिरा प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. 
कारवाईबाबतही प्रशासनाने कमालीची गुप्तता  पाळली होती. शनिवारी सकाळपासूनच पावनगडावर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी दक्षतेच्या कारणास्तव अडविले होते. शनिवारी दुपारी अतिक्रमित मदरशाचे अनधिकृत बांधकाम पूर्णपणे जमीनदोस्त केले. कारवाईवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, उप अधीक्षक अजित टिके, पन्हाळा उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे-जाधव, पन्हाळा नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी अमित माने हे ठाण मांडून होते.
शुक्रवारी संध्याकाळी प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे कायदेशीर बाबींचे पालन करत संस्थाचालकाने अतिक्रमणातील अनधिकृत बांधकामावरील पत्रे, लाकूड साहित्य काढून घेतले. उर्वरित पक्के बांधकाम प्रशासनाने जेसीबीच्या साहाय्याने काढले. यासाठी प्रशासनाने तीन जेसीबी, पाच डंपर याशिवाय महसूल व नगरपरिषदेच्या वाहनांसह पन्नास कर्मचारी, तसेच २०० पोलिसांचा फौजफाटा कार्यरत होता.

मदरसाचालकांचे म्हणणे
पावनगड येथील रि.स.न.१२८ पैकी या सरकारी मुलकीपड जमिनीचा काही भाग कोल्हापूर येथील शिक्षणप्रसारक मंडळ या संस्थेच्या ताब्यात होता. त्यांच्याकडून दारुल उलुम पावनगड या संस्थेने ती जागा अरबिया झिनतुल कुराण मदरसासाठी १९८४ मध्ये घेतली होती, तेव्हापासून शुक्रवारअखेर ती जागा या मदरशाच्या ताब्यात होती. आमची संस्था त्या जागेवरील इमारतीची देखभाल दुरुस्ती करत होती. तेथे अनाथ मुलांना शिक्षण दिले जात होते. तेव्हापासून कोणाचीही तक्रार नव्हती; पण अलीकडे काही संघटनांनी तक्रार केली. त्यानुसार जागा शासकीय असल्याचे सांगत प्रशासनाने आजची कारवाई केली आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून संबंधित जागा आमच्या संस्थेस नाममात्र भाडेतत्त्वावर परत मिळावी, असे मदरशाच्या विश्वस्त ट्रस्टीचे जुबेर मुजावर यांनी आज प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


कोट...
ही शासकीय मुलकीपड जमिनीत अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम केलेले होते. त्यामुळे हे अनधिकृत बांधकाम आज शासनातर्फे काढून घेतले आहे.
- माधवी शिंदे -जाधव, तहसीलदार, पन्हाळा

चौकट...
पन्हाळ्यावर जमावबंदी
पवनगडावरील कारवाईमुळे पन्हाळा नगरपरिषद हद्दीत आज दुपारी बारापासून ते रविवार (ता.०७) रात्री बारापर्यंत १४४ कलम अंतर्गत जमावबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत पाच व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.

असा होता बंदोबस्त
पोलिस अधीक्षक- ०१,
उपअधीक्षक-०१,
पोलिस निरीक्षक ०८,
उपनिरीक्षक २६,
पोलिस-२००

००००००००००००००

फोटो...१) उद्‌ध्वस्त केलेला हाच तो मदरसा
२)मदरसा पडण्याने चालू असलेले काम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com