
हत्ती चरींना अखेरची घरघर
01810
‘भुदरगड’ला चरखोदाईची गरज
ीअतिवृष्टीने बुजल्या; वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला
संजय खोचारे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव, ता. २९ ः भुदरगड तालुक्यातील वन विभागाने खोदलेल्या हत्ती -गवे चरी अखेरच्या घटका मोजत आहेत. वन्यप्राणी अरण्यक्षेत्रातून शेतहद्दीत येऊ नयेत म्हणून अठरा वर्षांपूर्वी वन विभागाने वनहद्दीभोवती हत्ती -गवे प्रतिबंधक चरखोदाई केली होती. दरवर्षी अतिवृष्टीमुळे चरी सध्या पूर्ण बुजल्या आहेत. या चरींची नव्याने खोदाई झाल्यास वन्यप्राण्यांचा शेतीला होणारा उपद्रव कमी होईल.
वन विभागामार्फत भुदरगड तालुक्यातील मौजे मुरुक्टे वनहद्दीवर वन्यप्राणी प्रतिबंध खोल चरींची २००५ला खोदाई झाली होती. यानंतर परिसरातील शेतपिकांना हत्ती, रानगवे यांचा होणारा उपद्रव कमी झाला होता. गेली सतरा ते अठरा वर्षे चरींच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे त्या गाळाने भरत आहेत. काही ठिकाणी चरी पूर्ण बुजून गेल्यामुळे वन्यप्राणी वनहद्दीतून शेता शिवारात येतात. वर्षभर शेतपिकाचे रानगव्यांच्या कळपाकडून नुकसान होते. भरपाईची मागणी केल्यास अत्यल्प मिळते. तीही वेळेत मिळत नाही. मुरुक्टे, मानवळे परिसरातील वनहद्दीत चाळीसहून अधिक रानगव्यांच्या कळपाचा वावर आहे. रानगवे दिवसा शिवार, वनहद्द, रस्त्यावर दर्शन देतात. वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी होण्यासाठी हत्ती प्रतिबंधक चरी उपयुक्त ठरतात. मात्र शासनाने चरींची पुन्हा नव्याने खोदाई करणे आवश्यक आहे. काही शेतकरी शेतावर राखणीसाठी मुक्कामाला थांबतात. काही शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्यापासून शेतपिकाचे नुकसान होऊ नये म्हणून सोलर कंपाउंड, काटेरी लोखंडी तारेचे कुंपण केले आहेत. वन विभागाने वनहद्दीभोवती पुन्हा हत्ती - गवे प्रतिबंधक चरखोदाई केल्यास वन्यप्राण्यांचा शेतीला होणारा उपद्रव कमी होईल.
कोट-
मुरुक्टेतील शेतीचे क्षेत्र वनहद्दीला जोडून आहे. येथे वन्यप्राण्यांच्या कळपांचा त्रास कायम होतो. २००५ ला वनहद्दीभोवती हत्ती-गवे प्रतिबंधक चरखोदाई केली होती. परिणामी पुढील पाच ते सात वर्षे वन्यप्राणी उपद्रव कमी झाला होता. वन विभागाने वन हद्दीभोवती असलेल्या चरींची पुन्हा खोल खोदाई करणे आवश्यक आहे.
- अरुण बेलेकर, माजी सरपंच, मुरुक्टे