
पेठवडगाव:किणी येथे लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक
किणी येथे लाखांचा गुटखा जप्त, एकास अटक
पेठवडगाव, ता. २५ : किणी (ता. हातकणंगले) येथील एकास गुटखा, तंबाखू व पानमसाला पदार्थांची अवैध वाहतूक व विक्रीप्रकरणी पोलिसांनी आज अटक केली. या सशंयिताकडून १ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी रियाज सलीम अत्तार (वय ३५, रा. केसरकर पेठ, सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुटखा, तंबाखू व पानमसाला किणी पथकर नाक्यावरून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नाक्याजवळ सापळा लावला. तेथे रियाज अत्तार याला पकडून त्याच्याकडे असलेली पिशवी तपासली असता विविध कंपन्यांचा प्रतिबंधित केलेला व मानवी जिवीतास अपायकारक असलेले पदार्थ, सुगंधित सुपारी, तंबाखू, गुटखा आढळून आला. पोलिसांना त्याला प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एल. एम. पठाण यांच्या समोर उभे केले असता त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गिरीश शिंदे करीत आहेत. पोलिस अंमलदार प्रमोद आप्पासो चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे.