
करंजिवणेतील माळभाग २० वर्षापासून अंधारात
करंजिवणेतील माळभाग २० वर्षांपासून अंधारात
सेनापती कापशी : करंजिवणे (ता. कागल) येथील माळवाडी गेली वीस वर्षे वीज नसल्याने अंधारात आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या ७० कुटुंबांचे हाल होत आहेत. स्थानिकच्या लोकप्रतिनिधींना वीज कंपनीने दाद न दिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गावचा विस्तार वाढत गेल्यावर गावापासून काही अंतरावर दक्षिण बाजूस लोक घरे बांधत आहेत. सध्या येथे ७० कुटुंबे राहत आहेत; मात्र गेली वीस वर्षे मागणी करूनही वीज मिळालेली नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक भौतिक सुविधांपासून दूर राहावे लागत आहे. पंडित दीनदयाळ योजनेतून विजेचे खांब टाकण्यासाठी प्रस्ताव दाखल केला होता; मात्र वीज कंपनीच्या उदासीनतेतून परिस्थिती जैसे थे आहे. पावसाळ्यात तर या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. याबाबत खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ यांनीही कंपनीशी पत्रव्यवहार केला असल्याचे ग्रामपंचायत सदस्य संजय आंग्रे यांनी सांगितले. रस्त्यावरील विजेचे बिल प्रथम भरा, त्यानंतर विचार होईल, असे वीज वितरणने स्थानिक लोकप्रतिनिधींना सांगितल्याने आता विजेसाठी आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.