विनंती थांबा नावाला

विनंती थांबा नावाला

82892

डीओटी विनंती थांबा नावालाच
एसटी चालक, वाहकांची मनमानी ; प्रवाशांना भुर्दंड

सकाळ वृत्तसेवा

शाहू नाका, ता. १० : एसटी महामंडळातर्फे ‘हात दाखवा, गाडी थांबवा!’ असे ब्रीदवाक्य कधी काळी होते. पण ‘हात दाखवून अवलक्षण...’ असा काहीसा अनुभव अनेक विनंती थांब्यांवर येत आहे.
प्रवासी मिळून जादा नफा मिळावा यासाठी महामंडळाने गर्दीच्या ठिकाणी विनंती थांबे उपक्रम राबविला आहे. मात्र विनंती थांब्यावर प्रवासी आणि विद्यार्थ्यांनी हात दाखवूनही चालक बस थांबवित नसल्याने एसटीला विनंती थांब्यावरील प्रवाशांचे वावडे आहे का, असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या पुढील डीओटी चौकातील विनंती थांब्यावर त्याचा प्रत्यय दररोज येत आहे. एसटीच्या योजनांना काही कर्मचारीच पायदळी घेत असल्याचे चित्र गडहिंग्लज, आजरा, चंदगड, सावंतवाडी, बेळगाव मार्गावर धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसकडे पाहिल्यानंतर दिसून येते. चालकांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड तर बसतोच, पण चालक - वाहकांच्या बेशिस्त वर्तनाकडे प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याने तोट्यातील एसटी अधिकच खड्ड्यात रूतत आहे. डीओटी चौकात हनुमानगर परिसर, ग्रीन पार्क, वनराई पार्क, मोरेवाडी, आर. के. नगर, राजेंद्रनगर परिसरातील नागरिकांसह शिवाजी विद्यापीठाच्या बी.टेकच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने समावेश असतो. गडहिंग्लज,आजरा, चंदगडसह गोवा, कर्नाटकातील निपाणी, बेळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटीचा विनंती थांबा सोयीस्कर आहे. अनेकजण येथे एसटीची वाट पाहत थांबतात. अनेकदा बसेस थांबविण्याची विनंती करूनही गाड्या थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे तास-तासभर थांबावे लागते. गडहिंग्लज, बेळगाव, चंदगड, आजरा येथून कोल्हापूरला येतानाही या विनंती थांब्यावर गाडी थांबत नाही. त्याचा फटका विशेषत: महाविद्यालयीन तरुण- तरुणींसह नागरिक व वयोवृद्धांना बसत आहे. चालक, वाहकांच्या मनमानी कारभाराचा फटका एसटीच्या उत्पन्नावर व प्रवाशांना बसत आहे.

कोट
00159
डीओटी चौकात कर्नाटकातील गाड्या थांबून प्रवाशांना घेऊन जातात. येताना येथे गाडी थांबवतात. त्यामुळे मी बेळगाव, निपाणीवरून येताना कर्नाटक गाड्यांनाच पहिली पसंती देतो.
- भीमराव आयदुड्डी, प्रवासी

00158
डीओटीच्या विनंती थांब्यावर एसटी बस थांबत नाहीत. बऱ्याचदा गावावरून येताना उशीर होतो. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकावर यावे लागते. तेथून मोरेवाडीकडे जाण्यासाठी रिक्षाला दीडशे ते दोनशे रुपये आकारणी होत असल्याने आर्थिक भुर्दंड बसत आहे.
- रेणुका भरते, प्रवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com