
सोळांकूर
03287
तळेवाडीतील रस्त्याला मुहूर्त मिळणार का?
सोळांकूर, ता. १६ : सोळांकूर - ऐनी मुख्य रस्त्यावरून तळेवाडीत जाणारा तसेच अनेक वर्षे दुर्लक्षित रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळणार का, ग्रामपंचायत नवीन पदाधिकारी रस्त्याच्या पूर्णत्वाकडे लक्ष देतील का, असा सवाल ग्रामस्थ व प्रवासी वर्गातून होत आहे.
आटेगाव- तळेवाडी-पोवारवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. १२०० च्या दरम्यान लोकवस्ती असणाऱ्या तळेवाडीत फाट्यावरून गावात जाणारा एक किलोमीटर रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडले आहे. ग्रामस्थांनी यापूर्वी श्रमदानातून रस्ता केला होता. यावर बारा वर्षांपूर्वी खडीकरण व डांबरीकरण केले होते. वर्षभरातच रस्ता उखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पंडेवाडी, आटेगाव, तळेवाडी व ऐनी, सावर्डेतील शेतकऱ्यांना डोंगररानात जाण्यासाठी उपयोग होतो. रस्त्यावरून वाहनांची ये-जा वाढल्याने ग्रामस्थांनी स्वखर्चाने मुरूम टाकून खड्डे बुजवले होते. तरीही रस्ता उखडून रस्त्यावर मोठे दगड व खडी पसरली आहे. दोन्ही बाजूला डोंगरदरी असल्याने खड्डे चुकविण्याच्या नादात अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी होत आहे.