सरवडे

सरवडे

04214
नरतवडे : राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ. शेजारी के. पी. पाटील, बाबासाहेब पाटील, धैर्यशील पाटील, किसन चौगले, आदी.
...

ए. वाय. यांनी केला राजकीय आत्मघात
पालकमंत्री हसन मुश्रीफ : नरतवडे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा
सरवडे, ता. १०: ‘स्वतःच्या राजकीय महत्त्‍वाकांक्षेसाठी आपल्या कार्यकर्त्यांना विरोधकांच्या दावणीला बांधणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशाला धुडकवणाऱ्या ए. वाय. पाटील यांना जनतेने ‘बिद्री’च्या निवडणुकीत जमिनीवर आणले; परंतु स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडणाऱ्या ए. वाय. यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असून, त्यांनी स्वतःचा राजकीय आत्मघात करून घेतल्याची टीका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
नरतवडे (ता. राधानगरी) येथील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या राधानगरी तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘बिद्री’चे अध्यक्ष के. पी. पाटील होते. यावेळी ए. वाय. पाटील यांच्या प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी यापुढील काळात के. पी. पाटील यांच्याच नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला.
मुश्रीफ म्हणाले, ‘बिद्रीच्या निवडणुकीवेळी ए. वाय. यांनी आपल्यासमोर ठेवलेल्या सर्व अटी आपण मान्य केल्या; परंतु मला त्यांनी शेवटपर्यंत खेळवत ठेवले. माझा विश्वासघात करून ते विरोधी पॅनेलमध्ये गेले. निवडणुकीत झालेल्या पराभवाने ए. वाय. उद्विग्न झाले असून, यामुळेच ते खोटे आरोप करीत आहेत.’
के. पी. पाटील म्हणाले, ‘माझ्या १९८५ च्या पहिल्या निवडणुकीपासून राधानगरीच्या जनतेने मला पाठबळ दिले; परंतु मध्यंतरी आमदारकीच्या दहा वर्षांच्या काळात ‘सोळांकूर’च्या टोलनाक्याने आपल्यात व जनतेत अंतर आले. हा टोलनाकाच आता कायमचा बंद झाला असून, जनतेने आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आता थेट आपल्यापर्यंत यावे. आपल्याला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का म्हणजे के. पीं.च्या हृदयाला धक्का असेल. म्हणून माझ्या कार्यकर्त्यांची यापुढे अडवणूक कराल तर खबरदार.’
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैय्या माने, धैर्यशील पाटील, हुतात्मा सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, तानाजी ढोकरे, तानाजी खोत, नामदेव पाटील यांची भाषणे झाली.
‘बिद्री’चे संचालक फत्तेसिंह भोसले-पाटील यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. विवेक गवळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील, अनिल साळोखे, विनय पाटील, मनोज फराकटे, विकास पाटील, अभिषेक डोंगळे, ‘बिद्री’चे संचालक राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, फिरोजखान पाटील, धनाजी देसाई, पंडित केणे, मधुकर देसाई, दीपक किल्लेदार, के. ना. पाटील, विलास कांबळे, युवराज वारके आदी उपस्थित होते. भिकाजी एकल यांनी आभार मानले.
...
कार्यकर्त्यांनी मोठे केले ...
‘बिद्रीच्या निवडणुकीत फसगत झाल्याने आपले मूळ कार्यकर्ते परत आपल्याकडे आले आहेत. अशा कार्यकर्त्यांचा अवमान करत मी मोठे केलेले आपल्याला सोडून जात असल्याचे ‘ते’ म्हणतात; परंतु आपण कार्यकर्त्यांना नव्हे तर कार्यकर्त्यांनी आपल्याला मोठे केल्याचे उपकार आपण विसरलात. नाहक आरोप करून स्वार्थासाठी बाजूला गेलात. यापुढे पक्षनेतृत्वाच्या आडवे जाणाऱ्यांची गय करणार नाही’, असा इशाराही के. पी. पाटील यांनी विरोधकांना दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com