
नांदणी मध्ये दोन गटात तुफान दगडफेक
नांदणीत दोन गटांत तुफान दगडफेक
एकमेकांकडे बघण्याचे कारण :
शिरोळ, ता. १६ः नांदणी (ता. शिरोळ) येथे एकमेकांकडे बघण्यावरून व गाडीचा हॉर्न वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. शिरोळ पोलिस घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. राज्य राखीव दलाचा पोलिस फोर्स घटनास्थळी दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरा शिरोळ पोलिस ठाण्यात दोन्ही गटाकडून परस्पर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नांदणी येथील स्टँड चौक परिसरात आंबी व चिकोडे अशा दोन गल्ली आहेत. या ठिकाणी सकाळी दहाच्या सुमारास एकमेकांकडे बघितल्याच्या कारणावरून तसेच गाडीचा हॉर्न जोरात वाजवल्याच्या कारणावरून एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली. या घटनेनंतर दोन्ही कुटुंबांकडून जमाव गोळा करून, एकमेकांच्या अंगावर, घरावर दगडफेक करण्यास सुरुवात झाली. ही बातमी शिरोळ पोलिस ठाण्यास समजली असता पोलिस ठाण्याचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करण्याकरीता पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. घटनेचे गांभीर्य ओळखून शिरोळ पोलिसांनी राज्य राखीव दलाचा पोलिस फोर्स घटनास्थळी तैनात केला आहे.
दरम्यान, प्रल्हाद लक्ष्मण आंबी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, अश्फाक चिकोडे, अरबाज मन्सूर चिकोडे, सूरज मन्सूर चिकोडे, सोहेल मालदार, असलम बाळू शेख, नौमान अमन चिकोडे, समीर अकबर नूरखान, जाहीद चांद चिकोडे अमन नबी चिकोडे, चंदू समशेर चिकोडे, दस्तगीर अल्लाउद्दीन चिकोडे, हुसेन समशेर चिकोडे यांनी जमाव करून दगडफेक केली.
तर यास्मिन मुनीर चिकोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, प्रल्हाद लक्ष्मण आंबी, प्रद्युमन किरण आंबी, निखिल प्रल्हाद आंबी, किरण लक्ष्मण आंबी, अमर नंदू आंबी, प्रज्वल अशोक सेवेकरी, ऋषिकेश दिलीप परीट, आप्पासाहेब गजानन उगारे, पप्पू दादबा आंबी, अनिल बिलुरे, ओंकार प्रल्हाद आंबी, किरण रामचंद्र आंबी, सुकुमार आंबी, भैया सुतार, प्रदीप उगारे, ओंकार वठारे, अभिजित मोरे, अनिकेत हिरेमठ, कृष्णा कोळी, राहुल गोसावी, सुयश वायचळ, किरण सुतार, कार्तिक कराळे यांनी दगडफेक करून जखमी केले.