
बीज बँकेची चळवळ आदर्श
76514
शेडशाळ ः येथे बीज बँकेच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना गणपतराव पाटील. व्यासपीठावर मान्यवर.
----------
बीज बँकेची चळवळ आदर्श
वसंत हंकारे; शेडशाळ येथे शेतकरी, महिलांना बीजचे वाटप
शिरोळ, ता. १९ ः शेडशाळ (ता. शिरोळ) येथील महिलांनी उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेले बीज बँकेचे काम हे राष्ट्र निर्माणाचे काम आहे. याचा प्रचार आणि प्रसार झाल्यास सकस अन्नामुळे चांगले विचार, योग्य संस्कार व आदर्श कुटुंब संस्कृती निर्माण होईल. बीज बँकेची सुरू झालेली ही चळवळ देशापुढे आदर्श ठरेल, असा विश्वास प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांनी व्यक्त केला.
शेडशाळ येथे महादेव स्वामी मठ आयोजित स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील महिला फौंडेशन, देशी वाण बीज बँकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी हंकारे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दत्त साखर कारखाना चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील होते. यावेळी शेतकरी व महिलांना बीजचे वाटपही करण्यात आले.
गणपतराव पाटील म्हणाले, ‘तीन वर्षांपासून येथील महिलांनी अतिशय कष्टाने बीज बँक स्थापन करून अभिमानास्पद कामगिरी केली आहे. हे काम छोटे वाटत असले तरी जगाच्या दृष्टीने फार मोठे आहे. शेतीच्या मातीत सोने पिकवण्याची हिंमत येथील महिलांमध्ये दिसून येते. आगामी काळात अडीच एकरांवर विविध जातीचे वाण तयार करून याची व्यापकता वाढवावी. या स्तुत्य उपक्रमास दत्त उद्योग समूह सर्वोतोपरी सहकार्य करेल.’
शिरोळ तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले म्हणाले, ‘कीटकनाशके, तणनाशकामुळे पोषक तत्वांची कमतरता भासत आहे. अशा परिस्थितीत देशी वाण बियाणे हे आरोग्यदायी ठरणार आहे.’ स्वागत शमशादबी पठाण यांनी केले, तर प्रास्ताविक वैशाली संकपाळ यांनी केले. सूत्रसंचालन महेश तारदाळे यांनी केले. आभार जयश्री शिरढोणे यांनी मानले.