
प्रकाश आंबेडकरांचा निश्चित फायदा होईल
निवडणुकांत ‘वंचित’चा शिवसेनेला निश्चित लाभ
माजी मंत्री भास्करराव जाधव ः मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भगवा फडकावेल
शिरोळ, ता. २५ ः ‘शिवसेना व वंचित बहुजन विकास आघाडी युती झाल्याने राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा आम्हाला निश्चित लाभ मिळेल’, असा विश्वास माजी मंत्री शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
शिरोळ येथे ‘गोकुळ’चे माजी चेअरमन दिलीपराव पाटील यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी भास्करराव जाधव आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना जाधव म्हणाले, ‘‘प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोठी फळी निर्माण केली आहे. त्यांच्या मतदारांचे स्वतंत्र असे पॉकेट आहे. शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यामुळे बहुजन समाजामध्ये समाधान पसरल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना एकतर्फी निवडणूक जिंकून महापालिकेवर निश्चित भगवा फडकावेल यात शंका नाही. तसेच शिवसेनेला सोडून ४० आमदारांनी भाजपशी हात मिळवणी केल्यामुळे माजी मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांना जनतेतून प्रचंड सहानुभूती मिळत आहे. एक संयमी आणि शांत स्वभावाचा माणूस म्हणून जनतेच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान मिळवले आहे.’’
जाधव पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील आणि केंद्रातील भाजप नेत्यांनी, राज्यातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा उचलला दिसत आहे. ईडीसारख्या चौकशा लावून, मराठी माणसाचे मनोबल खच्चीकरण करण्याचा पद्धतशीरपणे डाव टाकत आहेत.’’ या वेळी ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, अवधूत धनवडे, रणजित पाटील आदी उपस्थित होते.