
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा शिरोळ पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा शिरोळमध्ये मोर्चा
शिरोळ, ता.९ ः अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा. यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीतर्फे शिरोळ पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला.
शिरोळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी मोर्चा काढला. उपस्थित अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली.
शासनाने केलेल्या मानधनवाढीच्या आश्वासनाची पूर्तता करावी, ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस ग्रॅच्यूईटीला पात्र आहेत त्यांना ग्रॅच्यूईटी तत्काळ द्यावी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन द्यावी, अंगणवाडी केंद्राचे भाडे वाढवून द्यावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कार्यक्षम मोबाईल द्यावा, निवृत्त व मृत पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत सेवासमाप्ती लाभ द्यावा. अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना देण्यात येणारा पूरक पोषण आहाराच्या रकमेमध्ये महागाईनुसार वाढ करावी. यासह विविध मागण्याचे निवेदन अंगणवाडी कर्मचाऱ्यांतर्फे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व एकात्मिक विकास बाल प्रकल्प अधिकारी यांना दिले. अंगणवाडी कृती समितीचे दिलीप उटाणे, शोभा देशमुख, कमल परुळेकर, जयश्री पाटील, जीवन सरूडे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.