
शिरटीत मुलगी जन्मल्यास ठेवपावती
शिरटीत मुलगी जन्मल्यास ठेवपावती
मागासवर्गीय कुटुंबासाठी ग्रामपंचायतीच्या सभेत निर्णय; व्यक्ती मृत झाल्यासही अर्थसहाय्य
शिरोळ, ता. २० ः शिरटी (ता. शिरोळ) येथील मागासवर्गीय समाजातील कुटुंबात मुलगी जन्मल्यास तिच्या नावे ग्रामपंचायतीतर्फे २५०० रुपयांची ठेव पावती करण्यात येणार आहे. मागासवर्गीय कुटुंबातील व्यक्ती मृत पावल्यास त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी २००० रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत घेतला आहे.
ग्रामपंचायतीच्या १५ टक्के निधीतून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच अनिता चौगुले व उपसरपंच सागर पवार यांनी दिली. शिरटी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत गाव विकासाच्या ठरावांना मंजुरी दिली. तसेच सभेत ऐतिहासिक निर्णय घेताना मागासवर्गीय कुटुंबातील जन्म घेणाऱ्या कन्येस २५०० रुपयांची ठेव पावती व मागासवर्गीय समाजातील मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतीतर्फे २००० रुपयांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही ठरावास ग्रामपंचायत सदस्यांनी मंजुरी दिली आहे. शिरोळ तालुक्यात असा निर्णय घेणारी शिरटी ग्रामपंचायत पहिली ठरली आहे.
माजी खासदार राजू शेट्टी, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील व माजी आमदार उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापुढेही जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून निधी उपलब्ध करून अनेक विकास कामे मार्गी लावली असल्याचे सांगितले. माजी सरपंच राहुल सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माळी, भारती माळी, शुभांगी शिरगावे, हसीना मुल्लानी, सतीश चौगुले, अलम मुल्लानी आदी उपस्थित होते.