शिरोली : यात्रा १

शिरोली : यात्रा १

दीड वर्षात १४ कोटीची विकासकामे मंजूर
सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी यांची माहिती

शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायत १५ वित्त आयोग आणि ग्रामपंचायत स्वनिधीमधून शिरोलीमध्ये दीड वर्षात सुमारे १४ कोटीची विकासकामे मंजूर झाली आहेत. यापैकी काही विकासकामे पूर्ण झाली आहेत, तर काही विकासकामे सुरू असल्याची माहिती सरपंच पद्मजा कृष्णात करपे, उपसरपंच अविनाश अनिल कोळी व ग्रामविकास अधिकारी ए. वाय. कदम यांनी ''सकाळ''शी बोलताना दिली.
------

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरोलीची ओळख आहे. औद्योगिक वसाहतीमुळे शिरोलीची कागदोपत्री लोकसंख्या सुमारे 30 हजार असली तरी प्रत्यक्षात 80 हजाराहून अधिक लोक वास्तव्यास आहेत. यामुळे मूळ गावाच्या सभोवती अनेक वाढीव वसाहती वसल्या आहेत. या वाढीव वसाहतींना प्राथमिक सोयी सुविधा देण्याचे काम करताना शिरोली ग्रामपंचायतीला तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी केवळ ग्रामपंचायत निधीतून शिरोलीचा सर्वांगीण विकास साधने अशक्य आहे. यामुळेच ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन यांना विकास निधीसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा करीत आहे.

ग्रामपंचायतीवर विधान परिषदेचे माजी आमदार महादेवराव महाडिक, कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व राजाराम साखर कारखान्याचे अध्यक्ष अमल महाडिक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गोकुळच्या संचालिका व भाजप महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखालील महाडिक गटाची सत्ता आहे. तसेच राज्यात व केंद्रात ही भाजपची सत्ता आहे. भाजप सत्तेच्या माध्यमातून शिरोलीसाठी जास्तीत जास्त शासकीय निधी खेचून आणून, गावाचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन महाडिक आघाडीच्या नेतृत्वाने दिले होते. यामुळेच शिरोलीकरांनी एक हाती सत्ता महाडिक आघाडीच्या हाती दिली आहे. गेल्या दीड वर्षात शिरोली ग्रामपंचायतीचा कारभार महाडिक आघाडीने हाती घेतल्यानंतर विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.
ग्रामपंचायतीने शिरोलीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रस्ताव शासनाकडे दिले आहेत. शासनाच्या विविध योजना, पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून १४ कोटींचा विकास निधी मंजूर झाला आहे. सध्या १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. त्यातून २०२३-२०२४ मध्ये दहा कोटींवर निधीतून घनकचरा, अंगणवाडी, स्वच्छतागृह, पाणी, पूर उपाययोजना, टँकर, घंटागाडी, महिला अभ्यास दौरा, गटर्स, पाणी टाकी, स्मशानभूमी धोबीघाट प्राथमिक आरोग्य केंद्र, तर ग्रामपंचायत फंडातून सांस्कृतिक हॉल, सीसीटीव्ही, जॅकवेल, एलईडी याशिवाय योजनेतून अंगणवाडी शासकीय ग्रामपंचायत आरोग्य केंद्र इमारत अशी साडेदहा कोटींची कामे प्रस्तावित आहेत, तर दोन कोटी ५८ लाखांची दलित वस्ती सुधार, तांडा वस्ती, कन्या शाळा, उर्दू शाळा, आरोग्य केंद्र अशी कामे मंजूर आहेत.
माजी आमदार अमल महाडिक, शौमिका महाडिक यांचे सहकार्य आणि प्रयत्नातून कामे मंजूर झाली आहेत. या कामी ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील, महादेव सुतार, बाजीराव पाटील, विजय जाधव, मनीषा संकपाळ, श्रीकांत कांबळे, महंमद महात, कमल कौंदाडे, वासिफा पटेल, कोमल समुद्रे, नाझिया देसाई, हर्षदा यादव, आरिफ सर्जेखान, अनिता शिंदे, धनश्री खवरे, शक्ती यादव यांनी सहकार्य लाभल्याचे सरपंच करपे व उपसरपंच कोळी यांनी सांगितले.
---
कोट
शिरोली गावाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा तयार केला आहे. त्याची नियोजनबद्धरित्या अंमलबजावणी सुरू आहे. आमचे नेते अमल महाडिक व शौमिका महाडिक यांच्या माध्यमातून शासनाचा जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.
-पद्मजा करपे, सरपंच
---
सर्वांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. यामुळेच नागरिकांची सर्व कामे त्वरित मार्गी लागत आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन यांच्या एकत्रित कामामुळे शिरोलीची आदर्श गाव म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण करू.
-अविनाश कोळी, उपसरपंच
---
शिरोलीच्या सर्वांगीण विकासाचे विविध प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. प्रस्तावांच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा पाठपुरावा सुरू आहे. यापैकी काहींना मंजुरी मिळाली आहे. ही कामे लवकरच सुरू होतील.
-ए. वाय. कदम, ग्रामविकास अधिकारी, शिरोली पुलाची

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com