शिरोली : शिक्षण विभाग वगळता अन्य कामे शिक्षकांना नको

शिरोली : शिक्षण विभाग वगळता अन्य कामे शिक्षकांना नको

समितीकडून अहवाल सादर, निर्णय कधी?
अशैक्षणिक कामांतून सुटका करण्‍याची शिक्षकांची मागणी

युवराज पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोली पुलाची, ता. ११ : राज्यातील शिक्षकांना शिक्षण विभाग सोडून इतर विभागांची कामे देऊ नयेत, अशी महत्त्वाची शिफारस शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांसंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केली आहे. समितीने अहवाल शिक्षण विभागाला सादर केला आहे. त्यामुळे या अहवालाबाबत शिक्षण विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन, अशैक्षणिक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या शिक्षकांना विविध सामाजिक जबाबदाऱ्यांसह सुमारे दिडशे अशैक्षणिक कामे करावी लागतात. यामध्ये जनगणना, शालेय पोषण आहार वाटपाची कामे, पोषण आहारच्या नोंदी ठेवणे, धान्यसाठा नोंदविणे, धान्य, साहित्याची मागणी, शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे, विद्यार्थ्यांना धान्य वितरण करणे आदी अशैक्षणिक कामे करावी लागत असून, शिक्षण विभागाच्या नवनवीन धोरणानुसार त्यामध्ये वाढच होत आहे. शिक्षण हक्क कायद्यातील कलम २७ नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावण्यास परवानगी नाही. राष्ट्रीय दशवार्षिक जनगणना, निवडणूक आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच शिक्षकांना कामे देता येतात. मात्र, अशैक्षणिक कामामध्ये सातत्याने वाढ होत आहे. या अशैक्षणिक कामांमुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्याचे सांगत शिक्षक संघटनांनी या कामांना विरोध केला आहे. त्यामुळेच नवसाक्षरता अभियानातील निरक्षरांच्या सर्वेक्षणावरही शिक्षक संघटनांनी बहिष्कार घातला आहे. परिणामी या अभियानाचे काम पूर्ण क्षमतेने सुरू झालेले नाही. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांबाबत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला.
या अहवालामध्ये निवडणूक आणि जनगणना ही कामे सोडून शिक्षकांना शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांची कामे देऊ नयेत. शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक असलेली कामे शिक्षकांना करावी लागतील. त्यात शिक्षण विभागाच्या अखत्यारितील कामे उदाहरणार्थ युडायस नोंदणी, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, शालेय पोषण आहार अशी कामे करावी लागतील. शालेय पोषण आहाराच्या अभिलेख्यांसाठी स्वतंत्र यंत्रणा असावी अशी शिफारस केली आहे.
---
कोट
शिक्षकांना दिलेल्या अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अशैक्षणिक कामांतून शिक्षकांची सुटका करणे गरजेचे आहे.
विजयसिंह माने, अध्यक्ष, बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ, अंबप.
---
कोट
शिक्षण विभागाकडून अनेक प्रकारची माहिती मागवली जाते. या माहितीचा आणि शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा काहीही संबंध नसतो. या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांना प्रत्यक्ष शिकविण्यासाठी वेळ कमी मिळतो.
एस. डी. लाड, जिल्हाध्यक्ष, शैक्षणिक व्यासपीठ, कोल्हापूर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com