वरातीचा खर्च हळदी समारंभावर

वरातीचा खर्च हळदी समारंभावर

वरातीचा खर्च हळदी समारंभावर!
कोरोनानंतरचा बदल; घरातील मंडळी, नातेवाइकांसोबत आनंद
सकाळ वृत्तसेवा
उचगाव, ता. ३० : लग्न म्हणजे रात्रीची वरात आलीच. वरातीवर लाखो रुपये खर्च करणारी मंडळी आहेत. परंतु, कोरोनांतर गेल्या दोन-तीन वर्षांपासून वराती कमी झाल्या आहेत. वरातीऐवजी हळदी समारंभात नाचण्याचा आनंद घरातील मंडळी व नातेवाईक घेत आहेत. वरातीवरील खर्च आता हळदी समारंभावर होत आहे.
अलीकडे लग्न समारंभावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्याकडे कल वाढला आहे. लग्न समारंभातील कोणताही विधी मोठ्या उत्साहात व वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत आहे. मुहूर्तमेढपासून ते लग्न समारंभ होईपर्यंत विविध कार्यक्रमांसाठी अनेक पॅकेज आता इव्हेंट कंपनी उपलब्ध करून देत आहेत. ‘हौसेला मोल नाही’ या म्हणीचा प्रत्येय क्षणोक्षणी येतो.
लग्न समारंभ पार पडल्यानंतर सायंकाळी वधू-वरांची गावातून वरात काढणे हा कार्यक्रम प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीने करत असे. वरातीसाठी घोडे, बग्गी, आकर्षक रथाचा वापर होत असे. बॅन्जो, मर्दानी खेळ, मोठे साऊंड सिस्टिम यांचा वापर प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे करतो. अशा गोष्टींवर वारे माप खर्च होतात.
कोरोना काळापासून वराती कमी झाल्या आहेत. रात्रभर जागे राहून वरात काढण्यापेक्षा लग्नाच्या पूर्वसंध्येला हळदीच्या कार्यक्रमात सर्व घरदार नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येत. हळदी समारंभावर मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहेत. या समारंभात महिलांसह घरातील मुले वडीलधारी मंडळींसह सर्वांनाच आनंद साजरा करता येतो. शिवाय वादावादीचे प्रसंगही घडत नाहीत. त्यामुळे सध्या हळदी समारंभ उत्साहात साजरा करण्याकडे कल वाढला असून वराती कमी झाल्या आहेत.

कोट
वरातीचे महत्त्व
लग्न होऊन आलेल्या नववधूला गावातील ग्रामदैवतांची ओळख व्हावी व वधूला संपूर्ण गावातील लोकांनी पाहावे शुभाशीर्वाद द्यावेत यासाठी वरात काढण्याचा उद्देश असतो. तसेच, गावातील मुख्य ग्रामदैवत तसेच गावातील सर्व देवदेवतांना नारळ, पान, विडा देऊन सुखी संसारासाठी आशीर्वाद घेण्याचा उद्देश असतो. वरात झालेनंतरच नवविवाहितेचा गृहप्रवेश होतो.
------------------
कोट
हळदी समारंभाला काही ठिकाणी हिडीस रूप
लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ होतो. काही ठिकाणी यासाठी मोठ्या प्रमाणात शॉवरचा वापर करून पाण्याचा अपव्यय होतो. त्याचबरोबर रात्री बारापर्यंत गल्लीत मोठ्या साउंड सिस्टीम लावून नृत्य केले जाते. त्याचा त्रास सर्वांनाच होतो. हळदी समारंभात पिवडीचा वापर, अंड्यांचा वापर, गुलालाचा वापर केला जातो. त्यामुळे त्यातून पारंपरिक व धार्मिक महत्त्व जपले जात नाही, असे प्रकार थांबायला हवेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com