
वनव्यात मोटरसायकल जळून खाक
03537
बेलेवाडी ः वणव्यात खाक झालेली मोटारसायकल.
...
वणवा विझविणाऱ्या युवकाची
मोटारसायकल जळून खाक
---
उत्तूर-गारगोटी रस्त्यावर बेलेवाडी घाटातील घटना
उत्तूर, ता. १ ः येथील जोमकाईदेवी डोंगर परिसरात आग लागून वणवा पेटला. वणव्याची झळ तुषार घोरपडे यांच्या पॉलिहाउसला लागली. ही आग विझविण्यासाठी युवक मदतीसाठी धावले. पुढे आग विझवत असताना मागे आगीने मोटारसायकलला घेरले. आगीत मोटारसायकल खाक झाली. उत्तूर-गारगोटी रस्त्यावर बेलेवाडी घाटात दुपारी एकला ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील डोंगर गेले आठ दिवस जळत आहेत. रात्रीच्या वेळी आगीचे लोट व दिवसा धूर पसरलेला दिसतो. आज दुपारी ही आग घाटातील म्हसोबा देवालयाजवळून वरच्या बाजूला सरकली. या ठिकाणी तुषार घोरपडे यांच्या मालकीचे तीन पॉलिहाउस आहेत. त्यापैकी एका पॉलिहाउसला आगीने घेरले. या वेळी रस्त्यावरुन जाणारे युवक मदतीसाठी धावले. दरम्यान, गिरीश प्रकाश कुंभार (रा. आजरा) हे आपल्या मित्राची मोटारसायकल घेऊन उत्तूरहून पिंपळगावकडे पाहुण्यांकडे यात्रेसाठी जात होते. आग लागलेली पाहून ते मदतीसाठी मोटारसायकल रस्त्याशेजारी लावून आग विझवण्यासाठी धावले. हातात झाडाच्या ओल्या फांद्या घेऊन ते आग विझवत होते. एवढ्यात आगीने त्यांच्या मोटारसायकला घेरले. सुरुवातीला टायर पेटले, त्यानंतर टाकी जळून स्फोट झाला. आवाज ऐकून ते घटनास्थळी धावले असता आगीत मोटारसायकल खाक झाली होती. आगीत मोटरसायकल, पॉलिहाउस व शेतकऱ्यांचे गवत, जळाऊ लाकडे असे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत वन खात्याशी संपर्क साधला असता जंगलाला आग लागू नये म्हणून यापूर्वीच जाळरेषा काढली आहे. ही आग वाटसरूने टाकलेल्या पेटत्या काडीने लागली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.